टोलविरोधातील याचिका मागे का घेतली?, कुणी घ्यायला लावली?; राज ठाकरे यांचा थेट मुख्यमंत्र्यांनाच सवाल
थापा मारणाऱ्यांच मतदान कसं मिळतं? लोकाना टोल भरायचा आहे का? त्यांना आनंद मिळतोय का? मला ते कळत नाही. जे लोक टोल आकारत आहेत, त्यांच्या विरोधात मतदान झालं नाही तर टोलला तुमचा विरोध आहे हे त्यांना समजणार कसं?
ठाणे | 8 ऑक्टोबर 2023 : टोल दरवाढी विरोधात मनसे नेते राज ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. या टोल दरवाढीविरोधात येत्या दोन चार दिवसात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. त्यानंतरच टोलचं काय होणार हे मी तुम्हाला सांगेल, असं राज ठाकरे म्हणाले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोल दरवाढी विरोधात याचिका दाखल केली होती. ही याचिका त्यांनी मागे का घेतली? कुणाच्या सांगण्यावरून घेतली. माझा एकनाथ शिंदे यांना सवाल आहे, असं राज ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत. त्यांना लोकांचा आक्रोश परवडणारा नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. राज ठाकरे हे पत्रकार परिषदेत बोलत होते.
अविनाश जाधवला फोन केला. त्याला म्हटलं उपोषण वगैरे आपलं काम नाही. उद्या मी येतो. त्यानुसार आज आलोय. अविनाशला भेटलो. या लोकांसाठी जीव गमावू नकोस असं अविनाशला सांगितलं. एक माणूस मेल्यानं यांना काही फरक पडत नाही. अविनाशला उपोषण मागे घ्यायला लावलं आहे, असं सांगतााच दोन चार दिवसात उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्यानंतर वाढीव टोलचं काय होणार हे सांगेल, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.
त्यांना विचारत नाही
अनेक वर्षापासून टोल विरोधात आम्ही अनेक आंदोलने केली. आम्ही 62 ते 67 टोलनाके बंद केले. शिवसेना आणि भाजपचा जाहीरनामा आला होता. त्यात त्यांनी टोलमुक्त महाराष्ट्र करू असं जाहीर केलं होतं. 2014 आणि 2017 लाही जाहीर केलं होतं. पण तुम्ही त्यांना विचारलं नाही. मला टोलच्या आंदोलनाचं काय झालं हे विचारलं जातं. पण त्याचे रिझल्ट कुणाला दिसत नाही, असं ते म्हणाले.
त्याचं काय होतं?
काल मोपलवारांशी बोलणं झालं. ते म्हणाले. 2002ला या प्रकारचा करार झाला होता. त्यांनी मला एक नोट पाठवली. 2020 ते 2023चे दोन कॉलम आहेत. यात रिक्षा मोपेड यांना पथकर नाही. पेडररोडचा फ्लायओव्हरही यात आहे. तो अजून बंद झालेला नाही. त्याचेही पैसे घेतले जात आहे. टोलमध्ये गाड्या किती जातात, टोल किती जमा होतो आणि त्याचं होतं काय? असा सवाल त्यांनी केला.
पैसे जातात कुठे?
रस्ते नीट बांधले जात नाही तर कर का घेतला जातो. रोड टॅक्स आणि टोलही भरला जातो. हे पैसे जातात कुठे?, असं सांगतानाच सरकारी भाषा घाणेरडी. माझ्याविरोधात केसेस दाखल झाल्या तेव्हा पेपर यायचे. त्यात मला धरला की सोडला हेच कळायचे नाही. इतकी घाणेरडी भाषा असायची, असं ते म्हणाले.