Kalyan News | कल्याणमध्ये परप्रांतीय फेरीवाल्याला मनसे कार्यकर्त्यांकडून चोप, नेमकं प्रकरण काय?
कल्याणमध्ये परप्रांतीय फेरीवाल्यांना मनसे कार्यकर्त्यांकडून जोरदार चोप देण्यात आलाय. फेरीवाल्यांना मारहाण करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या घटनेची संपूर्ण कल्याण शहरात चर्चा होत आहे.
सुनील जाधव, Tv9 मराठी, कल्याण | 2 सप्टेंबर 2023 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणूस आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावर खूप संवेदनशील आणि आक्रमक आहे. मनसे पक्षाचा जन्मच या मुद्द्यावरुन झालाय. मनसे पक्ष स्थापन झाला तेव्हा पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतीयांच्या विरोधात एल्गार पुकारला होता. आताही मनसेकडून मराठीच्या मुद्द्यावरुन खळखट्याक आंदोलन केलं जातं. एका मराठी महिलेचा सोशल मीडियावर नुकताच व्हिडीओ व्हायरल झाला होता. या महिलेला मुलुंड येथे फक्त मराठी असल्याने घर नाकारण्यात आलं होतं.
या महिलेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. अखेर या महिलेला न्याय मिळाला. त्यानंतर एका महिलेने आपला गाळा परप्रांतीयांनी हडप केल्याचा आरोप केला. त्या महिलेच्या मदतीसाठीदेखील मनसेचे पदाधिकारी धावून गेले. त्यानंतर आता कल्याणमधून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कल्याणमध्ये एका विद्यार्थ्याला मराठी असल्याच्या मुद्द्यावरुन परप्रांतीय फेरीवाल्याने शिवीगाळ केल्याने मनसेकडून फेरीवाल्याला मारहाण करण्यात आलीय.
नेमकं काय घडलं?
वाशिंद येथे राहणारा एक विद्यार्थी कल्याणमध्ये काही कामानिमित्त आला होता. त्यावेळी त्याने कल्याण रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या स्कायवॉकवर बसलेल्या फेरीवाल्याकडून एक वस्तू विकत घेतली होती. ती वस्तू खराब असल्याने तो विद्यार्थी पुन्हा कल्याणमध्ये आला. विद्यार्थ्याने ती वस्तू बदलून देण्यासाठी फेरीवाल्याकडे विनंती केली. मात्र फेरीवाल्यांनी ती वस्तू बदलून देण्यास नकार दिला.
फेरीवाल्याने “तुम मराठी लोक ऐसे ही होते हो”, असे बोलून मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा अपमान केला. या विद्यार्थ्याने कल्याणमधील मनसे कार्यकर्त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर कल्याणमधील मनसे कार्यकर्त्यांनी त्या फेरीवाल्याला जोरदार चोप दिला. फेरीवाल्याला मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
विद्यार्थ्याची प्रतिक्रिया काय?
या घटनेनंतर संबंधित विद्यार्थ्याने आपली प्रतिक्रिया दिली. “मी सकाळी कल्याण येथे आलो होतो. यावेळी काही फेरीवाले आणि परप्रांतीयांनी मराठी भाषेवरुन शिवीगाळ केली. त्यामुळे मी कल्याण पूर्वेत रितसर तक्रार केली. त्यानंतर पुढे मनसे कार्यकर्त्यांनी योग्य ती कारवाई केली. त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद मानतो”, अशी प्रतिक्रिया संबंधित विद्यार्थ्याने दिली.
“फेरीवाले परप्रांतीयांनी तरुणाला मराठी भाषेवरुन शिवीगाळ केली. हा तरुण मनसे शाखेत आला. त्यानंतर आमच्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी योग्य ती समज दिली”, अशी प्रतिक्रिया कल्याणमधील मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली.