ठाणे आणि पालघरवर मनसेचा डोळा, श्रीकांत शिंदे यांची डोकेदुखी वाढणार; काय आहे गेम प्लान?
जर कोकणवासियाना चांगले रस्ते मिळत असेल तर आम्ही गुन्हे घ्यायला तयार आहोत. जे अपघात झाले त्या संदर्भात आमचा गुन्हा लहान आहे. आमचा पक्ष लोकांसाठी आहे. लोकांसाठी अनेक गुन्हे आम्ही घेऊ. रस्ता जोपर्यंत चांगला होत नाही तो पर्यंत आम्ही गप्प बसणार नाही.
ठाणे | 18 ऑगस्ट 2023 : लोकसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. ठाकरे गटाच्या मातोश्रीवर लोकसभा निवडणुकीसाठी जोरबैठका सुरू आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही सभांवर भर दिला आहे. तर भाजप, शिंदे आणि अजितदादा गटानेही सभांवर भर दिला आहे. आता यात मनसेही मागे राहिलेली नाही. मनसेनेही लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन आणि सूचना केल्या जात आहेत. मनसेने मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यावर अधिक फोकस केला आहे. त्यामुळे शिंदे गटाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मनसे नेते अविनाश जाधव यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीवर भाष्य केलं. आगामी लोकसभा निवडणुका संदर्भात चर्चा झाली. कार्यकर्त्यांनी काय करावं? पदाधिकाऱ्यांनी काय करावेय़ या संदर्भात देखील चर्चा झाली आहे. पुढच्या सहा महिन्यात घराघरांमध्ये महाराष्ट्र सैनिक पोहोचणार आहे, असं अविनाश जाधव यांनी सांगितलं.
डोकेदुखी वाढणार
आम्ही पालघर आणि ठाणे जिल्ह्यावर फोकस केला आहे. या दोन्ही जिल्ह्यातील लोकसभेच्या चारही जागा आम्ही लढवणार आहोत. तुल्यबळ उमेदवार देणार आहोत. आमची लढाई ही जिंकण्यासाठीच असेल, असंजाधव यांनी सांगितलं. मनसेच्या या भूमिकेमुळे शिंदे गट आणि भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे, ठाकरे गटाचे राजन विचारे आणि कपिल पाटील हे खासदार आहेत.
त्यामुळे या तिन्ही पक्षांना मनसेचा फटका बसू शकतो. यापैकी सर्वाधिक फटका कोणत्या पक्षाला बसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाविरोधात आक्रमक प्रचार केल्यास मनसेचा फटका श्रीकांत शिंदे आणि कपिल पाटील यांना सर्वाधिक बसण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे आणि कपिल पाटील यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
मनसेत मोठे प्रवेश होणार
अविनाश जाधव यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही टीका केली. आताच्या घडीला आलेले आमदार, खासदार मोजा हे कुठून आलेले आहेत? राष्ट्रवादी, काँग्रेस, महाराष्ट्र निर्माण सेना आणि शिवसेना अशा पक्षातून घेतलेल्या लोकांची भाजपने फळी बांधली आहे. उद्या यांची पडता काळ सुरू होईल तेव्हा कोणी यांच्याकडे थांबणार नाही. बाहेरून आलेल्या आमदारांनी संघटना बांधणाऱ्या आम्हा कार्यकर्त्यांना शिकवू नये.
एक आमदार आहे तो देखील आमचा हक्काचा आहे. तुमच्याकडे असलेले नगरसेवक, आमदार, खासदार हे बऱ्यापैकी बाहेरून आणलेले आहेत, असा हल्लाच जाधव यांनी चढवला. येणाऱ्या चार दिवसांमध्ये खूप मोठा प्रवेश शिवतीर्थावर होणार असल्याचा दावाही त्यांनी केला.