अभिनेत्री नुतन यांच्या बंगल्याचा भाग कोसळला, पावसाचा फटका; कुठे होता बंगला?
Maharashtra Rains IMD Monsoon Updates : मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. जुईनगर, सानपाडा, वाशी, बेलापूर या भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
गोविंद ठाकूर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई, ठाणे : मुंबई आणि ठाण्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सकाळपासूनच पावसाने जोर धरल्याने मुंबई, ठाण्यातील अनेक भागात पाणी साचले आहे. त्यामुळे काही भागात वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे. तर मुंबईकरांना पाण्यातूनच वाट काढून चालावे लागत आहे. मुंबईत झाड कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. तर ठाण्यात प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री नुतन यांचा बंगल्याचा काही भाग कोसळला आहे. यात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
हिंदी तसेच मराठी सिनेसृष्टीवर आपल्या सौंदर्याने आणि चतुरस्त्र अभिनयाने अधिराज्य गाजवणाऱ्या नुतन बहल यांचा मुंब्रा रेतीबंदर जवळ असलेल्या बंगल्याचा काही भाग काल अचानक कोसळला. बंगला गेली अनेक वर्षे बंद असल्याने सुदैवाने कोणतीच जीवित हानी झाली नाही. मुंबई पासून दूर आणि निसर्गाच्या सानिध्यात वास्तव्य करता यावे म्हणून मोठ्या हौसेने नुतन आणि त्यांचे पती डॉक्टर बहल यांनी मुंब्र्यातील घोलाई नगर जवळील डोंगरावर हा बंगला बांधला होता. गेल्या काही वर्षात सदर बंगला वादात सापडल्याने या बंगल्यात राबता नव्हता.
नुकसान नाही
नूतन यांचे पुत्र अभिनेता मोहनीश बहल वेळ मिळेल तेव्हा बंगल्यामध्ये येत असत. काल सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान रेतीबंदर सर्कल जवळील मुंब्रा येथील या बंगल्याचा काही भाग कोसळला. घटनेची माहिती मिळताच ठाण्याचे अग्निशमन दल आणि ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. या बंगल्याच्या भोवती संरक्षक कडे उभारले आहे. बंगल्याचं फार नुकसान झालं नसल्याचं सांगण्यात आलं.
पावसामुळे वाहतूक कोंडी
दरम्यान, आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुलुंड टोल नका येथे वाहतूक कोंडी झाली. ठाण्याकडून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे मुलुंड टोलनाका येथे वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. पाऊस आणि रस्त्याची कामे होत असल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली होती.
झाड पडून एकाचा मृत्यू
मुंबईतील मालाडमध्ये झाड पडल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. मालाडच्या मणिभाई चाळमध्ये मुसळधार पावसानंतर अचानक झाड पडल्याने एका 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीचे नाव कौशल दोशी असे आहे. या प्रकरणी मालाड पोलीस एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास करत आहेत. पाऊस सतत सुरू असल्यामुळे विक्रोळी पश्चिमेकडील सूर्यनगर येथील डोंगरावर असलेल्या सिद्धार्थ चाळ परिसरातील संरक्षण भिंत कोसळली. ही भिंत विभागातील नागरिकांसाठी बसण्यासाठी असणाऱ्या शेडवर पडली आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परिसरात भीतीचे वातावरण पसरले.