चोरट्यांनी ऑनलाईन डाळिंब खरेदीच्या बहाण्याने शेतकऱ्याला फसवण्याचा बेत आखला, पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम
शेतकऱ्याचा शेतीचा माल ऑनलाईन विकत घेण्याचे अमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यात घडली आहे.
नालासोपारा : शेतकऱ्याचा शेतीचा माल ऑनलाईन विकत घेण्याचे अमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. याप्रकरणी संबंधित शेतकऱ्याने तुलिंज पोलीस ठाण्यात तक्रार केली. शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. विशेष म्हणजे पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपींना घेरत त्यांच्या मुसक्या आवळल्या.
नेमकं प्रकरण काय?
अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील हिंगेवाडी या गावचे शेतकरी अमोल दगडू परे यांचे डाळिंब ऑनलाईन खरेदी करण्याच्या नावाने फसवणूक करण्यात आली. आरोपींनी डाळिंब ऑनलाईन खरेदी केल्याचं सांगत शेतकऱ्याला माल घेऊन नालासोपाऱ्यात बोलावले. शेतकऱ्याकडून त्यांनी 87 हजार 800 रुपयांचे 112 कॅरेट डाळिंब घेतले. पण डाळिंब घेतल्यानंतर भामट्यांनी शेतकऱ्याला पैशांसाठी फिरवाफिरव केली. आरोपींनी शेतकऱ्याची दिशाभूल केली. त्यानंतर ते फरार झाले.
शेतकऱ्याची अखेर पोलीस ठाण्यात धाव
आरोपींकडून आपली फसवणूक झाली, याची जाणीव शेतकऱ्याला झाली. अखेर हतबल झालेल्या शेतकऱ्याने पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्याने नालासोपाऱ्यातील तुलिंज पोलीस ठाणे गाठलं. तिथे त्याने आपली तक्रार नोंद करत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांकडे तक्रार दाखल करताना शेतकऱ्याची अस्वस्था आणि हतबलता त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती.
पोलिसांची धडाकेबाज कारवाई
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तुलिंज पोलिसांनी तातडीने कारवाई सुरु केली. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज मिळवले. त्यानंतर आरोपींचे मोबाईल लोकेशन ट्रेस करुन त्यांना हेरलं. त्यानंतर आरोपींना बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे आरोपींनी अवघ्या 24 तासाच्या आता मालासह टेम्पो आणि 2 आरोपींना पकडण्यात यश मिळविले. प्रकाश उमेश चौधरी (वय 25), मोहम्मद अजय सलीन रायनी (वय 29) असे अटक आरोपींचे नाव असून हे राहणारे वसई चे आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपींना वसई न्यायालयात दाखल केले असताना त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पोलिसांचे शेतकऱ्यांना आवाहन
कोरोना महामारीच्या काळात जीवनावश्यक वस्तूसह अन्य गरजेच्या वस्तू या ऑनलाईन खरेदीवर नागारीकांचा भर आहे. तसेच व्यापारी, शेतकरीही आपला माल हा ऑनलाईन विक्रीवर सर्वाधिक भर देत आहेत. पण प्रत्येक व्यापारी आणि शेतकऱ्याने आपला माल विकताना तो खरेदी करणारा व्यापारीच आहे का? याची माहिती करूनच घ्यावी, तेव्हाच माल द्यावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
हेही वाचा :
जुन्या भांडणाचा राग, तरुणावर भर दुपारी गोळीबार, बीड हादरलं! थरार सीसीटीव्हीत कैद
अकोल्यातील सुन्न करणारी घटना, ज्या हातांना राखी बांधली त्याच हातांनी लहान बहिणीचा खून