जितेंद्र आव्हाडांना घेऊन पोलीस रुग्णालयाकडे रवाना, रात्रभर पोलीस ठाण्यातच राहावं लागणार?
जितेंद्र आव्हाडांना ठाण्याच्या विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात एका प्रेक्षकाला मारहाण प्रकरणी ठाणे पोलिसांकडून अटक करण्यात आलीय.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आलीय. जितेंद्र आव्हाडांना ठाण्याच्या विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात एका प्रेक्षकाला मारहाण प्रकरणी ठाणे पोलिसांकडून अटक करण्यात आलीय. त्यांना आज दुपारपासून अटक करण्यात आलीय. पोलिसांकडून गेल्या अनेक तासांपासून आव्हाडांचा जबाब नोंदण्याची प्रक्रिया सुरु होती. त्यानंतर पोलीस जितेंद्र आव्हाडांना वैद्यकीय तपासणीसाठी ठाण्याच्या जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले आहेत. तिथे त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.
जितेंद्र आव्हाड यांना आज ठाणे कोर्टात नेलं जाणार होतं. पण तसं झालं नाही. पोलिसांनी आज कदाचित त्यांचा जाब नोंदवला. या दरम्यान आता कोर्टाचा कामकाजाचा वेळ संपलाय.
त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेलं जात आहे. त्यामुळे त्यांना कदाचित आज रात्रभर वर्तक नगर पोलीस ठाण्यात राहावं लागण्याची शक्यता वर्तवली जातेय.
जितेंद्र आव्हाड यांना वैद्यकीय तपासणीसाठी पोलीस ठाण्यातून बाहेर आणलं तेव्हा काही माध्यम प्रतिनिधींनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी जितेंद्र यांनी दोन शब्दांत आपली भूमिका मांडली.
“मला अटक झाली याचा मला आनंद आहे. ही अटक बेकायदेशीर आहे. ही दादागिरी आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड या जितेंद्र आव्हाड यांना भेटण्यासाठी ठाण्याच्या वर्तकनगर पोलीस ठाण्यात जावून आल्या. पोलिसांवर दबाव आहे. दबावातून ही कारवाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
या प्रकरणात अभिनेत्री केतकी चितळेने उडी घेतलीय. ठाण्यातील चित्रपटगृहात एका प्रेक्षकाला झालेल्या मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केतकी चितळेने केली आहे. केतकीच्या वकिलांनी पोलिसांना तसं पत्रदेखील पाठवलं आहे.
“जितेंद्र आव्हाड यांच्यावर मारहाण प्रकरणी जे कलम लावण्यात आले आहेत ते लगेच जामीन मिळतील असे कलम लावण्यात आले आहेत. पण त्यामध्ये विनयभंगाचं कलम लावण्यात आलेलं नाही. विवियाना मॉलमध्ये चित्रपटगृहात ज्या प्रेक्षकाला मारहाण झाली त्यांच्या पत्नीसोबत जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी गैरवर्तन केलं”, असा आरोप केतकी चितळेने केला आहे. त्यामुळे आव्हाडांविरोधात विनयभंगाचं कलम लावावं, अशी मागणी केतकी चितळेने केली आहे.