समृद्धी महामार्गावरील अपघातात 20 कामगारांचा मृत्यू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गावर शहापूर येथे अपघात घडलेल्या ठिकाणी जावून पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया केली. यावेळी त्यांनी या दुर्घटनेत 20 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.
शहापूर | 1 ऑगस्ट 2023 : समृद्धी महामार्गावर रसत्याचं काम सुरु असताना सोमवारी मध्यरात्री मोठी दुर्घटना घडली. लॉन्चर आणि गर्डर पडल्यामुळे ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तर 3 जण जखमी झाले, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे दौरा पूर्ण केल्यानंतर शहापुरातील दुर्घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
“झालेली घटना अतिशय दुर्देवी आणि दुखद आहे, 700 टनाचा लॉन्चर आणि गर्डर 1250 किलोचा आहे. टेक्निकल काम चालू होतं. पण दुर्देवाने लॉन्चर आणि गर्डर खाली पडल्यामुळे अतिशय दुर्देवी घटना घडलीय. या दुर्घटनेत 20 कामगारांचा मृत्यू झालाय. 3 जण जखमी आहेत. तर 5 जण सुरक्षितपणे बाहेर पडले. दुर्घटनावेळी 28 जण काम करत होते”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
“या घटनेची चौकशी होईल, कलम 304 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कंपनी स्वित्झर्लंडची आहे. त्यांचीदेखील एक्सपर्ट टीम येथे येईल. या घटनेचा तपास होईल. पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. चौकशीत जे बाहेर येईल त्याप्रमाणे कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
मृतकांच्या कुटुंबियांना एकूण 17 लाखांची मदत दिली जाणार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: या घटनेची दखल घेतली आहे. मृतांच्या परिवारांना पंतप्रधान मोदींनी 2 लाखांची घोषणा जाहीर केलीय. तर राज्य सरकारकडून 5 लाखांची मदतीची घोषणा जाहीर झालीय. तसेच मुख्य कंपनी नवयुगाने देखील 5 लाख रुपये मदत देण्याचा निर्णय घेतलाय. तसेच वीएसएल या कंपनीने देखील मृत कामागारांच्या कुटुंबांना 5 लाखांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतकांच्या कुटुंबियांना राज्य-केंद्र सरकार आणि दोन्ही कंपन्या यांच्याकडून मिळून प्रत्येकी 17 लाखांची मदत दिली जाणार आहे.
“हे घाईचं काम नाही. टेक्निकल काम आहे. नेमकं काय झालंय, याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. एक्सपर्ट टीम येईल. हे काम घाई गडबडीने करुच शकत नाही. तसा कुठलाही विषय नाही. चौकशीतून सत्य समोर येईल”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.