शिवाजी पार्क हातचे जाणार? शिंदे गटाच्या त्या कृतीने ठाकरे गटाला धक्का; दसरा मेळावा कुणाचा होणार?
शिवसेना आमच्याकडे आहे. धनुष्य बाण आमच्याकडे आहे. बाळासाहेबांचे विचार आमच्याकडे आहेत म्हणून अनेकजण आमच्याकडे येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे, असं नरेश म्हस्के म्हणाले.
गणेश थोरात, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, ठाणे | 30 सप्टेंबर 2023 : दादरच्या शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा घेण्यावरून पुन्हा एकदा ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने येणार आहेत. शिंदे गटाने शिवाजी पार्क मैदानावर दावा केला आहे. तसा अर्जही केला आहे. त्यामुळे शिवाजी पार्क मैदान कुणाला मिळणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. शिवाजी पार्क मैदान आपल्यालाच का मिळायला पाहिजे? याचं लॉजिकच शिंदे गटाने दिलं आहे. त्यामुळे यंदा शिवाजी पार्कात आवाज कुणाचा घुमणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
शिंदे गटाचे प्रवक्ते, माजी महापौर नरेश म्हस्के यांनी शिवाजी पार्क मैदानावर आमचाच मेळावा होणार असल्याचं म्हटलं आहे. दसरा मेळाव्यात बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचारांचे सोने लुटण्यासाठी या… अशी आमची टॅग लाईन होती. मूळ शिवसेना धनुष्यबाण आमच्याकडे आहे आणि बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार आमच्याकडे आहेत. शिवाजी पार्कवर शिवसेनेचा मेळावा व्हायचा आणि तो अधिकार आता आमचा आहे, असं नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे.
त्यांनी कधीच हिंदुत्व सोडलंय
उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा विचार सोडला आहे. ज्यांनी सनातन धर्माच्या विरोधात अतिशय चुकीच्या पद्धतीची वक्तव्य केली, त्यांच्या स्वागतासाठी ठाकरेंनी पायघड्या टाकल्या. त्यांच्या विरोधात एक चकार शब्दही काढला नाही. ते हिंदुत्वाचे पुरस्कर्ते कसे होऊ शकतात? असा सवाल म्हस्के यांनी केला.
तसाच मेळावा होणार
त्यांच्या मेळाव्यात गद्दार, वज्रमूठ, शिव्याशाप या व्यतिरिक्त काहीच असणार नाही. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेणे हा आमचा अधिकार आहे. मेळाव्याची परवानगी मिळावी म्हणून आम्ही अर्ज केला आहे. बघू काय होतं ते. तुम्ही पाहताय मागच्यावेळी त्यांनी शिवाजी पार्कवर सभा घेण्याची परवानगी कोर्टातून घेतली. त्यांच्या मेळाव्याला किती माणसं होती? आमचा बीकेसीला मेळावा झाला. अलोट गर्दी लोटली होती, असं सांगतानाच यंदाही बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत जसा मेळावा होत होता, तसाच मेळावा होईल, असा दावा त्यांनी केला.
आता तसं नाही
आजचे सरकार सर्वांचे आहे. सर्व सामान्यांचे आहे. पूर्वी माणूसघाणा प्रकार होता. माणसांची अॅलर्जी होती. आता तसं नाही. आता लोकांमध्ये मिसळणारा मुख्यमंत्री आहे. लोकांनाही काम करणारा मुख्यमंत्री हवा आहे. तो त्यांना मिळाला आहे, असं ते म्हणाले.
तुम्ही काय केलं?
ज्या कोकणवासियांच्या जीवावर इतके वर्ष सत्ता उपभोगली नंतर त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. तुमची सत्ता असताना तुम्ही काय निर्णय घेतले? तुम्ही टीका करा आम्हाला काहीही फरक पडत नाही. कुणीही निंदा, कुणीही वंदा लोकांसाठी काम करणे हाच आमचा धंदा आहे, असा हल्लाच त्यांनी चढवला.