Shivsena : ज्यांनी शिवसेना सोडली त्यांच्यासाठी धक्कादायक बातमी; काय होणार आमदार, खासदारांचं?
शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात भाजपने बैठकांवर बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. जो मतदारसंघ आपला नाहीच त्याच मतदारसंघात भाजपने बैठका घेण्यास सुरुवात केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, ठाणे | 23 सप्टेंबर 2023 : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाजप खच्चीकरण करत आहे. त्यांना संपवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या दोन्ही नेत्यांना नंतर भाजपच्याच तिकीटावर निवडणूक लढवावी लागणार आहे, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला होता. त्यानंतर आता रोहित पवार यांनी आणखी एक मोठा दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या सर्व खासदारांना भाजपच्या तिकीटावरच निवडणूक लढवावी लागू शकते, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार सातत्याने शिंदे गट आणि अजितदादा गटाला भाजपच्या तिकीटावर लढावं लागणार असल्याचं सांगत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
कल्याण मतदारसंघात श्रीकांत शिंदे स्वतः खासदार आहेत. तिथेच भाजपा बैठका घेत आहे. भाजप कल्याणची सीट मागू शकते. नाहीतर खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या सर्वच खासदारांना कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल, असं रोहित पवार यांनी म्हटलंय. ते मीडियाशी संवाद साधत होते.
लोकनेत्यांनाही संपवतात
भाजपची प्रवृत्ती हीच आहे. लोकनेत्याला जवळ करायचं आणि संपवायचं. गोपीनाथ मुंडे असतील, एकनाथ खडसे असतील किंवा भाऊसाहेब फुंडकर असतील हे सर्व भाजपचे लोकनेते होते. पण त्यांना स्वत:च्याच पक्षाने संपवलं. एवढेच नव्हे तर इतर पक्षातून येणाऱ्या नेत्यांनाही भाजप संपवत असते. त्यामुळेच भाजपने श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. याचा अर्थ काय होतो? भाजपच्या मनात काय आहे याचा अंदाज यातून दिसून येतं. आज बैठका घेतील, उद्या भाजपवाले कल्याणच्या जागेवर दावाही करतील. त्यामुळे पुढे तर अशी परिस्थिती येईल की श्रीकांत शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या खासदारांना कमळाच्या चिन्हावरच लढावे लागेल, असं रोहित पवार यांनी सांगितलं.
तो आरोप हस्यास्पद
रोहित पवार यांनीच भाजपसोबत जाण्याची भूमिका शरद पवार यांच्याकडे मांडली होती. असा गौप्यस्फोट सुनील शेळके यांनी केला होता. त्यावर रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे. सुनील शेळके आमचे मित्र आहेत. त्यांचं विधान हस्यास्पद आहे. त्यांचं पूर्ण स्टेटमेंट मी ऐकलं नाही. त्यांचं पूर्ण विधान ऐकल्यावरच मी उत्तर देईन, असंही त्यांनी सांगितलं.