घरचा उपाशी, बाहेरचा तुपाशी… ट्विटर वॉर सुरूच; जितेंद्र आव्हाड आणि शीतल म्हात्रे यांच्यात जुंपली
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऊर्दूतील पोस्टरवरून या दोन्ही नेत्यांमध्ये जुंपली आहे.
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांच्यात जोरदार ट्विटर वॉर सुरू आहे. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार शेरेबाजी सुरू आहे. एकमेकांच्या ट्विटला टॅग करत हे नेते एकमेकांवर तोंडसुख घेताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मालेगावातील सभेतील ऊर्दूच्या पोस्टरवरून ही शाब्दिक चकमक उडाली आहे. शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांचे ऊर्दूतील पोस्टर ट्विट केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंब्र्यातील ऊर्दूमधील पोस्टर ट्विट करत, ताई… यावर बोला, असं आव्हानच दिलं. त्यानंतर पुन्हा दोन्ही नेत्यांमध्ये ट्विटचा सिलसिला सुरू झाला.
शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांनी ट्विट करून पवारांची भाकरी आणि उद्धवजींची चाकरी… लगे रहो भाईजान असं ट्विट केलं. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनीही सणकून टीका केली. त्याची आपल्याला चिंता नसावी. उगाचच बोलायला लावू नका. घरचा उपाशी आणि बाहेरचा तुपाशी, अशी खोचक टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. ही टीका करताना त्यांनी शीतल म्हात्रे यांना टॅगही केलं आहे.
वाद कुठून सुरू झाला?
शीतल म्हात्रे यांनी 25 मार्च रोजी त्यांच्या ट्विटरवर उद्धव ठाकरे यांच्या मालेगावातील सभेचं एक पोस्टर पोस्ट केलं होतं. त्यावर ऊर्दूत मजकूर होता. त्यावरून शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटावर टीका केली. ह्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदीव स्वराज्य घडवलं होतं. नक्की महाराष्ट्राच्या याच मातीत जन्मलात ना तुम्ही? हीच का तुमची हिंदुत्ववादी विचारधारा? असा सवाल शीतल म्हात्रे यांनी केला होता.
शीतल म्हात्रे यांच्या या ट्विटला जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यांनीही एकनाथ शिंदे यांचं मराठवाड्यातील एक पोस्टर ट्विट केलं. त्यावरही ऊर्दूतून मजकूर होता. हे पोस्टर ट्विट करत, यावर बोला ताई… खास तुमच्या माहितीसाठी… कारण नंतर दुसऱ्यावर ढकलायची तुमची सवय आहे, असं आव्हाड यांनी म्हटलं.
त्याची आपल्याला चिंता नसावी..उगगाच बोलायला लावू नका,…घरचा उपाशी बाहेरचा तूपाशी …..@sheetalmhatre1 https://t.co/a5HLSZ9vSI
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 26, 2023
धूर चक्क राष्ट्रवादीतून आलाय
आव्हाड यांच्या या ट्विटला शीतल म्हात्रे यांनी चांगलाच रिप्लाय दिला. मुंब्र्यात कधीही शिवजयंती साजरी न करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना ट्विट चांगलच झोंबलेलं दिसतंय. पण मला एक समजत नाही, मी बॅनर उद्धवजींचा टाकलाय आणि धूर चक्क राष्ट्रवादीमधून आलाय, अशी खोचक टीका शीतल म्हात्रे यांनी केली.
शीतल म्हात्रे यांच्या ट्विटला आव्हाड यांनी पुन्हा रिप्लाय दिला. मला काम करताना गवगावा करण्याची सवय नाही.लोकांसाठी कार्यक्रम करतो. माझ्या मतदारसंघात येऊन विचारा. उघड्यावर लाज घालवणारे कृत्य मी करत नाही. आठवतेना काय ते ढुं..ण काय तो दांडा… धूर कुठुन निघाला, असा हल्लाबोल आव्हाड यांनी केला. त्यावर म्हात्रे यांनी पुन्हा एकदा उत्तर देत, पवारांची भाकरी आणि उद्धवजींची चाकरी …. लगे रहो भाईजान, असा टोला त्यांनी लगावला.