‘ऑपरेशन ऑल आऊट’, पोलीस अॅक्शन मोडमध्ये, थर्टी फर्स्टला एकही चुकीचं पाऊल महागात पडेल
उल्हासनगर पोलीस ३१ डिसेंबरच्या रात्री मद्यप्राशन करून गाडी चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार आहेत. उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये २९ ठिकाणी नाकाबंदी करून १०२ अधिकारी आणि ६२५ कर्मचारी तैनात राहणार आहेत. 'ऑपरेशन ऑल आउट' अंतर्गत तडीपार आणि गुन्हेगारांचा शोध घेतला जाईल. पहाटे ४ वाजेपर्यंत उघडे असलेल्या बार आणि रेस्टॉरंटमुळे रात्री उशिरा मद्यप्राशन करून वाहन चालवण्याची शक्यता लक्षात घेऊन हा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
थर्टी फर्स्टला दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी उल्हासनगर परिमंडळातील उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये २९ ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे. यासाठी १०२ अधिकारी आणि ६२५ कर्मचाऱ्यांसह SRPF ची एक प्लाटून तैनात असणार आहे, अशी माहिती उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे.
थर्टी फर्स्टला पहाटे चार वाजेपर्यंत बार आणि रेस्टॉरंट सुरू राहणार आहे. त्यामुळे अनेक जण रात्री उशिरा दारू पिऊन गाड्या चालवण्याची शक्यता आहे. यात कोणताही अपघात किंवा अनुचित प्रकार होऊ नये, या अनुषंगाने पोलिसांकडून उल्हासनगर परिमंडळातील उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात २९ ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे. यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस केल्या जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे.
तसेच थर्टी फर्स्टच्या रात्री तडीपार गुन्हेगार, रेकॉर्डवरील गुन्हेगार, गुंड यांच्या शोधासाठी ‘ऑपरेशन ऑल आउट’ राबवलं जाणार असल्याचीही माहिती गोरे यांनी दिली आहे. परिमंडळ ४ मध्ये थर्टी फर्स्टच्या रात्री कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तब्बल १०२ कर्मचारी आणि ६२५ कर्मचाऱ्यांची फौज तैनात असणार असून SRPF ची एक प्लाटून देखील पोलिसांच्या सोबतीला तैनात असणार आहे, अशी माहितीही सचिन गोरे यांनी दिली आहे.
जळगावात सायंकाळी 7 वाजेपासून पोलिसांचा फौजाफाटा रस्त्यावर
दरम्यान, जळगावात काल 31 फर्स्टच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जळगाव उपविभागात नाकाबंदी करण्यात आली. या माध्यमातून वाहनधारकांची तपासणी करण्यात आली. यात ब्रेथ अन्यालायझर या मशिनीचा वापर करण्यात येवून वाहनधारकांची मद्य प्राशन केल्या बाबतची तपासणी करण्यात आली. यात दोषी आढळल्यास नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. सायंकाळी 7 ते पहाटे पाच वाजेपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती.
थर्टी फर्स्ट च्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस कर्मचाऱ्यांची वेगवेगळी पथक नियुक्त करण्यात आली. यात वाहनधारकांची मध्यप्रदेशनासह हॉटेलधारकांचीही पथकाच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. सायंकाळी सात ते पहाटे पाच वाजेपर्यंत पोलिसांच्या पथकाची कारवाई सुरू होती. नियम न पाळणारा संबंधितांवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात आली.