कारसेवक छाताडावर गोळ्या झेलत होते, तेव्हा उद्धव ठाकरे फोटो…; देवेंद्र फडणवीस बरसले
आम्ही अयोध्येला जात आहोत. पण तुम्ही येऊ शकत नाही. आता रामाला काय उत्तर द्यावं हे तुम्हाला समजत नाही. म्हणून तुम्हाला यायला लाज वाटत आहे. ज्या रामाला नाकारलं, त्या रामाला काय उत्तर द्यायचं? अरे नजरे कैसे मिलाऊ रामलल्ला से... अशी अवस्था तुमची झाली आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मयुरेश जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, ठाणे | 14 जानेवारी 2024 : देवेंद्र फडणवीस म्हणतात ते कारसेवेला गेले होते. मशीद पडली तेव्हा ते अयोध्येत होते. पण फडणवीस यांचं वय तेव्हा काय होतं? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला आहे. मी अवघा वीस वर्षाचा असताना कारसेवेला गेलो होतो. एकदा नाही तीनदा गेलो होतो. बाबरीचा ढाचा पडला तेव्हा मी तिथेच होतो, असं सांगतानाच पण उद्धवजी, तेव्हा तुम्ही कुठे होता? कारसेवक छाताडावर गोळ्या झेलतो होते, तेव्हा तुम्ही जंगलात जाऊन फोटो काढत होता, अशी खरपूस टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाण्यात कारसेवकांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. कारसेवकांचं अभिनंदन करतो. कालपरवा उद्धव ठाकरे यांनी विचारलं, फडणवीस म्हणतात, ते कारसेवक आहेत, तेव्हा त्यांचं वय काय होतं? अरे हो… मी 20व्या वर्षी कारसेवेला गेलो. जेव्हा रामाची सेवा करण्याचा मौका मिळाला तेव्हा कारसेवेला गेलो. उद्धवजी तुमचं तर वय होतं कारसेवा करण्याचं. तुम्ही कुठे होता? तुम्ही काय करत होता? तुम्ही का गेला नाही कारसेवेला? त्यावेळी तुम्ही निसर्गाची फोटोग्राफी करत होता. तेव्हा तुम्ही चित्र काढत होता. ज्यावेळी कारसेवक गोळ्या खात होते, त्यावेळी तुम्ही जंगलात फोटो काढत होते. त्यावेळी तुम्ही कुठल्या तरी वाघाचे फोटो काढत होता. खरे वाघ मशिदीवर चढून कोठारी बंधूच्या रुपाने झेंडा लावत होते, छातीवर गोळी खात होते, मृत्यूमुखी पडत होते, अन् तुम्ही फोटो काढत होता. तुम्ही आम्हाला काय सवाल करता?, असा सवालच देवेंद्र फडणवीस यांनी केला.
माझी आधी ओळख रामसेवक
मीही अभिमानाने सांगतो मी कारसेवक आहे. पहिल्या कारसेवेला 20व्या वर्षी गेलो होतो. त्यावेळी बदायूच्या जेलमध्ये 18 दिवस होतो. दुसऱ्या कारसेवेच्यावेळी जेव्हा कलंकित ढाचा खाली आला तेव्हा मी तिथेच होतो. एवढेच नव्हे तर अटलजींच्या काळात तिसरी कारसेवा झाली. तेव्हाही मी तिथे होतो. कारण मी कारसेवक आहे, राम सेवक आहे. उपमुख्यमंत्री म्हणून माझा परिचय दुसरा आहे. त्यापेक्षा महत्त्वाचा परिचय रामसेवक आणि कारसेवक म्हणून आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तुम्ही शेण खात होता
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली. राम मंदिराचं निर्माण आज देशाला अस्मिता देत आहे. हे केवळ मंदिर नाही, भारतीय संस्कृतीचा हुंकार आहे. ही ठाणे धर्मनगरी असली तरी इथे काही महाभाग राहतात. राम काय खात होता हे सांगणारे. राम काय खात होते हे बाजूला ठेवा. तुम्ही नक्कीच शेण खाता हे आमच्या लक्षात आलंय. अशा शेण खाणाऱ्यांना बाजूला ठेवा आणि रामसेवा सुरू ठेवा, असा हल्लाच त्यांनी चढवला.