पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या पटोलेंना अटक करा, भाजपच्या मागणीने जोर धरला
नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याऐवजी पोलीस भाजपाच्या लोकप्रतिनिधींना आणि कार्यकर्त्यांनाच अटक करीत आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी असा हा प्रकार असून पोलिसांनी पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली.
मुंबई : पंतप्रधानांबद्दल (Pm modi) संतापजनक वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याऐवजी पोलीस भाजपाच्या लोकप्रतिनिधींना आणि कार्यकर्त्यांनाच अटक करीत आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी असा हा प्रकार असून पोलिसांनी पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. आपण पंतप्रधानांबद्दल बोललोच नव्हतो असा खुलासा पटोले यांनी केला असून हा खुलासा हास्यास्पद आहे. चोर तो चोर वर शिरजोर असाच हा प्रकार आहे. नारायण राणे यांना अटक करताना जो न्याय लावला तोच न्याय पटोले यांनाही लावावा. पंतप्रधानांबद्दल संतापजनक वक्तव्य करणाऱ्या पटोलेंविरोधात तक्रार दाखल करून घेण्यास पोलीस तयार नाहीत. असा आरोपही त्यांनी केला आहे.
भातखळकरांची पटोलेंविरोधात पोलिसात तक्रार
पंतप्रधान यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करणार्या नाना पटोलेंवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा अशी तक्रार भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी समतानगर पोलीस स्टेशनला केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पुतळा जाळल्या नंतर भातखळकर यांना अटक करण्यात आली, त्यावेळी ते समता नगर पोलीस ठाण्यातून बोलत होते.तसेच पंजाब राज्यात पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबतीत घडलेल्या घटनेचा व नाना पटोले यांनी “मी मोदींना मारू शकतो” या केलेल्या विधानाचा काही संबंध आहे का? याची सखोल चौकशी सर्वोच्च न्यायालयाने गठित केलेल्या समितीने केलीच पाहिजे अशी मागणी अतुल भातखळकर यांनी यावेळी केली. महाभकास आघाडी सरकारने याविरोधात नाना पटोले वर कोणतीही कारवाई केली नाही. परंतु यापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर खासदार नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्या नंतर मात्र त्यांना अर्धा तासाच्या आत अटक करण्यात आली. त्यामुळे या राज्यात सत्ताधारीनी काहीही केलं तरी त्यांना वेगळ्या न्याय आणि विरोधकांना वेगळा न्याय अशा प्रकारची हुकूमशाही या राज्यात सुरू आहे अशी टीका भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर केली.
गुन्हा दाखल न झाल्यास न्यायालयात जाणार
कांदिवलीमध्ये नाना पटोले यांचा पुतळा जाळल्या प्रकरणी पोलिसांनी भातखळकर यांना अटक केली असता विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रकार ठाकरे सरकार करत असल्याची ही टीका त्यांनी यावेळी केली. भातखळकर यांनी समता नगर पोलिस ठाण्यात नाना पटोलेंवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी असे तक्रार पत्र देखील दिले आहे. तसेच जर नाना पटोलेंविरोधात गुन्हा दाखल न झाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचे सुद्धा आमदार भातखळकर यांनी यावेळी संगितले.