महायुतीचा चार जागांवर अखेर तोडगा?, कल्याण, ठाण्यातून कोण? संभाजीनगरची जागा कुणाला?; काय घडलं पडद्यामागे?
अखेर महायुतीतील चार जागांच्या वाटपाचा तिढा सुटला आहे. संभाजीनगर, कल्याण, ठाणे आणि पालघर या चार जागांवरून शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रदीर्घ चर्चा करून या चारही जागांचा तिढा सोडवला आहे. त्याची लवकरच घोषणा केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, यात शिंदे गटाच्या एका विद्यमान खासदाराचा पत्ता कापला गेल्याचंही सांगितलं जात आहे.
महायुतीत कळीचा मुद्दा ठरलेल्या चार जागांवर अखेर तोडगा निघाला आहे. महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत दीर्घ चर्चेनंतर हा तोडगा काढण्यात आला आहे. त्यानुसार अखेर कल्याण आणि ठाण्याची जागा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला देण्यात आली आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे हे कल्याणमधून लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाण्यातून नरेश म्हस्के किंवा प्रताप सरनाईक यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे यांना जोरदार टफ फाईट मिळणार आहे.
महायुतीत ठाणे, कल्याण, संभाजीनगर आणि पालघरच्या जागेवरून रस्सीखेच सुरू होती. त्यामुळे शिंदे गटाच्या पहिल्या यादीत या चारही जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आले नव्हते. भाजपने या जागांवर दावा केला होता. परिणामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पहिल्या यादीत विद्यमान खासदार असलेल्या आपल्या मुलाचे नावही जाहीर करता आले नव्हते. ठाणे घ्या किंवा कल्याण द्या, अशी अटच भाजपने शिंदे गटाला घातल्याचं समजत होतं. त्यामुळे मुख्यमंत्री पेचात पडले होते. ठाणे सोडले तर बालेकिल्ला जातोय आणि कल्याण सोडलं तर पराभवाच्या भीतीने कल्याण सोडल्याची चर्चा होतेय, अशी कुचंबना शिंदे यांची झाली होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या दीर्घ चर्चेनंतर अखेर दोन्ही मतदारसंघ पदरात पाडून घेण्यात मुख्यमंत्र्यांना यश आलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
म्हस्के ठाणेदार?
शिंदे गटाला कल्याण आणि ठाणे दोन्ही मतदारसंघ मिळाले आहेत. त्यामुळे कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाण्यातून नरेश म्हस्के आणि प्रताप सरनाईक यांच्या नावाची चर्चा आहे. त्यातही नरेश म्हस्के यांचं नाव सर्वाधिक आघाडीवर आहे. म्हस्के यांच्या मागे ईडीची प्रकरणे आहेत. त्यामुळे त्याचा निवडणुकीत निगेटिव्ह परिणाम होऊ शकत असल्याने त्यांना तिकीट देणं योग्य होणार नाही असं एका गटाचं म्हणणं आहे. तर शिंदे यांनी सवतासुभा मांडल्यापासून नरेश म्हस्के यांनी पक्षाची भूमिका व्यवस्थित आणि आक्रमकपणे मांडली आहे. शिवाय उद्धव ठाकरे मुंब्र्यात शिवसेना शाखेत येणार होते. उद्धव ठाकरे मुंब्र्यात आल्यावरही त्यांना शाखेत जाण्यापासून म्हस्के यांच्या नेतृत्वातील शिवसैनिकांनी रोखलं होतं. त्याची बक्षिसी म्हणून म्हस्के यांना ठाण्याची सुभेदारी दिली जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.
पालघर गेले
तर पालघरची जागा भाजप लढणार आहे. गेल्या वेळी भाजपच्या राजेंद्र गावित यांनी शिवसेनेच्या तिकिटावरून निवडणूक लढवली होती आणि त्यात ते विजयी झाले होते. त्यामुळे ही जागा आमचीच आहे, असा दावा करत भाजपने त्यावर दावा केला होता. शिंदे गटानेही ही जागा आता भाजपला दिल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा पत्ता कापला गेल्याचं सांगितलं जात आहे. याबाबतची लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
संभाजीनगर शिवसेनेचेच
दरम्यान, संभाजीनगरची जागा मिळवण्यात शिंदे गटाला यश आल्याचं सांगितलं जात आहे. भाजपने संभाजीनगरवर दावा केला होता. मात्र, नंतर त्यांनी हा दावा सोडलाय. त्यामुळे शिंदे गट ही सीट लढवणार असून शिंदे गटाकडून संदीपान भुमरे संभाजीनगरमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास संदीपान भुमरे यांची लढत ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्याशी होणार आहे. ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे, शिंदे गटाचे संदीपान भुमरे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील असा सामना संभाजीनगरमध्ये रंगताना दिसणार असल्याचं सांगितलं जात आहे.