दिवसभर घरीच असेल कधीही या, देवेंद्र फडणवीसांचं ट्विट; पोलीस सागर बंगल्यावर येऊन चौकशी करणार
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी फडणवीस यांना नोटीस बजावली असून त्यांची चौकशी करणार आहेत. फडणवीस यांनीही ट्विट करून पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.
मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी (police) फडणवीस यांना नोटीस बजावली असून त्यांची चौकशी करणार आहेत. फडणवीस यांनीही ट्विट करून पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. पुण्यातील सर्व कार्यक्रम मी रद्द केले आहेत. त्यामुळे मी दिवसभर घरीच असेल. तुम्हाला चौकशी करायची असेल तर कधीही या, असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तर, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गृहमंत्रालयाने फडणवीस यांची बीकेसी पोलीस ठाण्याऐवजी त्यांच्या सागर या बंगल्यावरच चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सकाळी 10.30 नंतर केव्हाही पोलीस फडणवीस यांच्या घरी जाऊन त्यांची चौकशी करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर, पोलिसांनी दिलेल्या नोटिशीची राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात होळी करण्याचा निर्णय भाजपने (BJP) घेतला आहे. त्यामुळे आज दिवसभरात राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी काल ट्विट केलं होतं. त्यात त्यांनी आज आपण घरीच राहणार असल्याचं म्हटलं होतं. सहपोलिस आयुक्त, गुन्हे यांचा दूरध्वनी मला आत्ता आला होता. त्यांनी सांगितले की, तुम्ही पोलिस स्टेशनला येण्याची आवश्यकता नाही. आम्हीच घरी येऊन तुमच्याकडून आवश्यक ती माहिती घेऊ. मी माझे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले असून, दिवसभर घरी उपलब्ध असेन. ते केव्हाही येऊ शकतात, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
भाजप करणार नोटिशीची होळी
दरम्यान, भाजपने आज पोलिसांच्या नोटिशीची होळी करण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करत नाही. तर त्याऐवजी महाविकास आघाडी सरकारच्या पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांनाच नोटीस बजावली याचा आपण तीव्र निषेध करतो. या प्रकरणात संपूर्ण भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी असून उद्या रविवारी प्रत्येक जिल्ह्यात भाजपाचे कार्यकर्ते नोटिशीची होळी करून निषेध नोंदवतील, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कालच जाहीर केले आहे.
बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर त्याची तपशीलवार माहिती असलेला पेन ड्राईव्ह मा. देवेंद्र फडणवीस यांनी त्याच दिवशी केंद्रीय गृहसचिवांकडे तपासासाठी सादर केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. अशा रितीने देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करून हा तपास रोखता येणार नाही. यामध्ये अनेक धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता आहे. असा इशारा त्यांनी दिला आहे.
मी माझे उद्याचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले असून, दिवसभर घरी उपलब्ध असेन. ते केव्हाही येऊ शकतात. जयहिंद, जय महाराष्ट्र !
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 12, 2022
संबंधित बातम्या:
वर्ध्यात तीन वाहनांचा विचित्र अपघात, दोघांचा मृत्यू, तिघे जखमी, अपघातात लहान मुलाचा समावेश
धुळ्यात भरदिवसा ‘ खाकी ‘ रक्तबंबाळ, बाईकला कट मारल्याचा वाद, PSI वर चाकूहल्ला
Viral : चक्क जिभेवर आलेत काळे केस! काय आहे नेमका प्रकार? वाचा सविस्तर…