Accident | ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले अन् होत्याचं नव्हतं झालं, मुंबई-नाशिक महामार्गावर 3 गाड्यांचा विचित्र अपघात
अपघातात तब्बल तीन गाड्याचा एकमेकांवर आदळल्या असून यामध्ये एक गंभीर तर दोन किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या प्रवाशांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ठाणे : रस्त्यांवरील अपघातात (Accident) रोज शेकडो प्रवाशांचा मृत्यू होतो. वाहतुकीचे नियम (Traffic Rules) पाळण्याचे आवाहन करुनही रोज अशा घटना घडताना दिसतात. मुंबई-नाशिक (Mumbai- Nashik) महामार्गावर वशिंद जवळील धिंगडा हॉटेल जवळ तर एक विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या असून यामध्ये एक गंभीर तर दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या प्रवाशांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले, ट्रक खांबावर जाऊन आदळला
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या दिशेने जात असताना ट्रकचा मुंबई-नाशिक महामार्गावर हा अपघात घडला. यामध्ये ट्रक चालकाचे आपल्या गाडीवरील नियत्रंण अचानकपणे सुटले. यामध्ये पुढे जात असलेल्या दोन गाड्यांना या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रक रस्त्याच्या बाजूला लावण्यात आलेल्या विजेच्या खांबावर जाऊन आदळला. यामध्ये ट्रकची मोठी नासधूस झाली. तसेच ट्रक खांबाला आदळल्यामुळे तो वाकला असून विजेच्या तारांमध्ये शॉर्टसर्किट झाले. विजेच्या तारा खाली पडलेल्या असल्यामुळे वशिंद विभागाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. सध्या तो पूर्ववत करण्यात आला आहे.
कारला धडक दिल्याने तिघे जखमी, रुग्णालयात उपचार सुरु
या विचित्र अपघातात एका चारचाकी कारचेदेखील मोठे नुकसान झाले. तर कारमध्ये प्रवास करत असलेले 3 जण जखमी झाले. यामधील दोघेजण किरकोळ जखमी झाले असून एकजण गंभीर जखमी झाला. सर्वांना उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नागपुरात कारला ट्रकची धडक, चार जणांचा मृत्यू
दरम्यान, दुसरीकडे राजस्थानच्या भिलवाडाकडून नागपूरला परतत असताना तवेराला ट्रकने धडक दिली. ट्रक आणि चारचाकी तवेरा यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात नागपुरातील पाचपावली संकुलातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय तीन जण गंभीर जखमी झालेले. जखमींना प्राथमिक उपचारानंतर नागपूरला हलविण्यात आले. बयाबाई हरिदास नंदनवार (वय 56), मुलगा महेश नंदनवार (वय 29), मुलगी अर्चना गणेश खापरे ( वय 33) आणि प्रमोद दशरथ धार्मिक ( वय 22) अशी मृतांची नावे आहेत. भोपाळ-नागपूर महामार्गावरील पांढुर्णा तालुक्याला लागून असलेल्या मोही घाटी गावात शनिवार-रविवार मध्यरात्री तीन वाजता विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने चारचाकी वाहनास धडक दिली.
इतर बातम्या :
मृत्यूनंतर गणेशचा दफनविधी केला! 3 दिवसांनंतर पोलिस आले, दफन केलेलं प्रेत बाहेर काढून….
विजया बाविस्कर हत्या प्रकरण; मैत्रीणीनेच केला विश्वासघात, ‘असा’ झाला हत्येचा उलगडा