महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला भेडसावतोय नवा त्रास, परिस्थिती पूर्ववत कधी होणार?
महाराष्ट्रात पावसाळा सुरु झाल्यानंतर भाज्यांचे भाव चांगलेच वाढले आहेत. विशेष म्हणजे टोमॅटोचे भाव तब्बल चार पटीने वाढले आहेत. तसेच इतर भाज्यांचे देखील भाव वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेपुढे आता महागाईचं नवं संकट उभं राहिलं आहे.
मुंबई : महाराष्ट्रात यावर्षी मान्सून उशिरा दाखल झाला. जून महिन्याची 20 ते 22 तारीख उजाडली तरी पाऊस आलेला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांना धडकी भरली होती. पावसाची वाट पाहत-पाहत तो आलाच नाही तर? अशी भीती अनेकांना वाटू लागली होती. पण सुदैवाने उशिरा का असेना, पण पाऊस दाखल झाला. शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला. तर शहरी भागातील नागरिकांची उकाड्याने सुटका झाली. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात तर पाऊस चांगलाच कोसळतोय. यााशिवाय राज्यभरात मान्सून आता दाखल झालाय. पाऊस आला ही चांगली गोष्ट आहे. पण हा पाऊस सोबतीला महागाई घेऊन आलाय. पावसानंतर भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.
मुंबईत भाज्यांचे दर किती?
मुंबईसह अनेक शहरात पावसाने हजेरी लावल्यानंतर भाज्यांचे दर वाढले आहेत. पूर्वी 60 ते 80 रुपये किलोने विकला जाणारा भाजीपाला आता 120 ते 140 रुपये किलो आहे. पाऊस पडल्यानंतर भाज्यांचे दर नेहमीच वाढतात, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. कारण पावसात भाज्या कमी असतात. पूर्वी 40 ते 50 रुपये किलोने विकले जाणारे टोमॅटो आता 80 ते 100 रुपये किलोने विकले जात आहेत.
पावसानंतर महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकात टोमॅटो खराब झाल्याचे भाजीपाला व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे बाजारात भाजीपाला कमी येत आहे. त्यामुळे किंमत वाढली आहे.
नाशिकमध्ये भाज्यांचे दर किती?
नाशिकमध्येही भाज्यांचे भाव गगनाला भिडले असून भाज्या आता सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर जाताना दिसून येत आहे. मान्सून उशिराने दाखल झाला. त्याचप्रमाणे पाऊस आला नसल्याने स्थानिक आणि जवळच्या भागातून येणाऱ्या भाज्या बाजारात कमी प्रमाणात येत आहेत. बाहेरून सगळा भाजीपाला येत असल्याने त्याचा ट्रान्सपोर्टेशन आणि इतर चार्ज बघता त्या भाज्यांचे दर चांगलेच वाढले आहेत. हे दर सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाताना दिसते आहे. त्यामुळे सामान्य माणसासमोर भाज्या खाव्या तरी कशा? असा प्रश्न पडला आहे.
नाशिकमधील भाज्यांचे दर प्रतिकिलो
टोमॅटो – 100 किलो सिमला मिरची – 120 किलो काकडी – 60 किलो भेंडी – 80 किलो गवार – 100 किलो ढेमस – 100 किलो वांगी – 60 किलो
15 ते 20 रुपये प्रति किलो टोमॅटोचे भाव चार पटीने वाढले
राज्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे महिन्याभरापर्वी शेतकऱ्यांना आपल्या शेतामधला टोमॅटो अक्षरशः गुरांना खाऊ घालण्याची वेळ आली होती. बाजारामध्ये टमाट्याची आवक आज मात्र घटल्यामुळे टमाट्याचे भाव गेल्या महिन्याच्या तुलनेत जवळपास चार पटीने वाढल्याचे बघायला मिळत आहे. जे टमाटे महिन्याभरापूर्वी 15 ते 20 रुपये प्रति किलोंना विकले जात होते तेच टमाटे आज बाजारांमध्ये 80 ते 90 रुपये प्रति किलोने विकले जात आहेत.
पुण्यात भाज्यांचे दर काय?
पुण्यात पालेभाज्यांच्या घरात सरासरी 25 ते 30 रुपये तर फळबाजांच्या दरात देखील 35 रुपयांची सरासरी वाढ झाली आहे. काल एका दिवसात पुण्यात 90 ट्रकपेक्षा देखील जास्त भाज्यांची आवक झाली. भाज्यांची मागणी वाढल्याने हे दर पुढील काही दिवस असेच राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.