Video| पुन्हा अवकाळी तडाखा, शेतकऱ्यांना हुंदके अनावर; उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भाला इशारा
हवामान विभागाकडून विदर्भ आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नाशिकः पुन्हा एकदा अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रातल्या अनेक भागांना तडाखा दिला आहे. यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीने अगोदरच शेतकरी हैराण असताना, या दणक्याने केळी, पपई, कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. रानात होणारी गारपीट आणि पिकांचा पडलेला खच पाहून शेतकऱ्यांना हुंदके फुटत आहेत. हे सारे थांबणार कधी आणि आमच्या संसाराचे गाडे सुरळीत होणार कधी, असा सवाल त्यांच्यामधून उपस्थित केला जात आहे.
येथील दृश्ये धक्कादायक
धुळे जिल्ह्यात शिंदखेडा, साक्री तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले. शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यात सुमारे दहा ते पंधरा मिनिटे सोसाट्याच्या वाऱ्यासह गारा पडल्या. त्यामुळे रानारानात पपई आणि केळीचा खच पडला. वादळी वाऱ्याने अनेक गावातील घरांवरील पत्रे उडाले. शिंदखेडा तालुक्यातल्या विरदेल आणि चिलाने गावालाही या गारपीटीने झोडपून काढले. त्यामुळे केळी, पपई आणि कांद्याचे अतोनात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांना यापूर्वीची नुकसान भरपाई मिळाली नाही. आता हे झालेले नुकसान कसे भरून निघणार, अशी चिंता त्यांना पडली आहे.
आज आणि उद्याही पाऊस
भारतीय हवामान विभागाच्यावतीने राज्यात ऐन थंडीच्या दिवसांत विविध ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर भारतावरील ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा (WD) प्रभाव पडण्याची दाट शक्यता असल्याने काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आणि काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडीने विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो ॲलर्ट जारी केला आहे.
मराठवाडा, विदर्भ उत्तर महाराष्ट्रात हजेरी
हवामान विभागाकडून विदर्भ आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 8 ते 9 जानेवारी दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदूरबार आणि जळगाव या जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. तर नाशिक, अहमदनगर ठाणे आणि पालघर मध्येही पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागामध्येही पाऊस हजेरी लावू शकतो.
येथे यलो अलर्ट
– 8 जानेवारी – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यांना 8 जानेवारीला यलो अॅलर्ट देण्यात आलाय. – 9 जानेवारी-अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्याला यलो अॅलर्ट.
येथेही होईल पाऊस 8 जानेवारी : ठाणे पालघर व उत्तर महाराष्ट्र,विदर्भातील काही भाग 9 जानेवारी : मराठवाडा आणि विदर्भातील काही भाग
इतर बातम्याः
Nashik| सामाजिक कार्यकर्त्या, महिला हक्क संरक्षण समितीच्या माजी अध्यक्ष साधना तोरणे यांचे निधन
Nashik Crime|भयंकर आक्रीत, चौथीतल्या मुलीला जंगलात फाशी देण्याचा प्रयत्न; पंचक्रोशीत खळबळ!