तुळजाभवानी मंदिर आणि छत्रपती घराण्याचं काय आहे नातं? तुळजापूर बंदच्या वादाचं मूळ कारण काय?
राज्यातील तीन शक्तिपीठांपैकी महत्त्वाचे स्थान असलेल्या तुळजाभवानीच्या दर्शनाला छत्रपती शिवाजी महाराज नियमित येत असत. शिवाजी महाराजांच्या मनात या भगवती देवीबद्दल पूर्ण श्रद्धा होती.
तुळजापूर – छत्रपती शिवरायांचे (Shivaji Maharaj)वंशज आणि राज्यसभा खासदार संभाजीराजे (sambhajiraje)यांना तुळजाभवानीच्या मंदिरात गाभाऱ्यात प्रवेश नाकारल्यानं, तुळजापुरात (Tuljapur band) त्याचे तीव्र पडसाद उमटले. जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि मंदिर प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या विरोधात शिवप्रेमी आणि ग्रामस्थांनी पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. वकील संघटनेनंही या बंदला पाठिंबा दर्शवत या वादाची तीव्रता वाढवली आहे. तुळाभवानी मंदिराच्या व्यवस्थापनाबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्य तुळजापूरकरांच्या मनात असलेला असंतोष यानिमित्ताने व्यक्त झाला असेही सांगण्यात येते आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भोसले घराण्यात तुळजाभवानीचे अनन्य साधारण महत्त्व होते.
छत्रपतींच्या घराण्याचं तुळजाभवानी मंदिराशी नातं छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले हे मराठवाड्यातील वेरुळचे होते. शिवरायांचे पणजोबा बाबाजी भोसले यांच्याकडे वेरुळ गावाची पाटीलकी होती. आूबाजूच्या गावांची जहागीरीही त्यांच्याकडे होती. त्या काळात हा प्रदेश निजामशाहीत होता. बाबाजींना मालोजीराजे आणि विठाजीराजे अशी दोन मुलं होती. वेरुळला आजही मालोजीराजेंची गढी आहे. मराठवाड्यातील भोसलेंची कुलदेवता तुळजापूरची तुळजाभवानी. मालोजीराजे भोसलेंनी वेरुळच्या घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. शिखर शिंगणापुरातील तलावही त्यांनी बांधला होता. छत्रपती शहाजी राजे यांचाही वेरुळशी जवळचा संबंध होता. तुळजापुरची तुळजाभवानी हे कुलदैवत असल्याने भोसले घराण्यातील सगळे नेहमीच देवीच्या दर्शनमाला जात असत.
छत्रपती शिवरायांचे श्रद्धास्थान राज्यातील तीन शक्तिपीठांपैकी महत्त्वाचे स्थान असलेल्या तुळजाभवानीच्या दर्शनाला छत्रपती शिवाजी महाराज नियमित येत असत. शिवाजी महाराजांच्या मनात या भगवती देवीबद्दल पूर्ण श्रद्धा होती. छत्रपतींच्या गळ्यात असलेली कवड्यांची माळ ही तुळजाभवानीच्या अपार श्रद्धेपोटीच असल्याचेही सांगितले जाते. छत्रपती शिवरायांनी तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार केला. छत्रपती शिवरायांना याच तुळजाभवानीने भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्याचा आशीर्वाद दिला. तुळजाभवानी मंदिरात दोन प्रवेशद्वारे आहेत, त्यांना छत्रपती शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांची नावे देण्यात आली आहेत.
मंदिराचा इतिहास तुळजा भवानीच्या काही भागाची रचना ही हेमाडपंती आहे. राष्ट्रकुट किंवा यादव काळात हे मंदिर बांधण्यात आले असावे, त्याचा पुढे छत्रपती शिवरायांनी जीर्णोद्धार केला.
छत्रपतींच्या वंशजांना थेट गाभाऱ्यात प्रवेश या मंदिरात छत्रपतींच्या वंशजांना दर्शनासाठी थेट गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो. ही परंपरा आहे. देवीचा पहिला नैवेद्य छत्रपतींकडूनच दिला जातो. छत्रपती संभाजीराजेंनीही जुना ४० वर्षांचा फोटो दाखवून याची आठवण करुन दिली. इंग्रजाची आणि निजामाची राजवट असतानाही छत्रपतींच्या घराण्यातील व्यक्तीला कधीही देव्हाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आले नव्हते.
छत्रपती संभाजीराजेंना गाभाऱ्यात प्रवेश नाकारल्याने वाद छत्रपती संभाजीराजे तुळजाभवानीच्या दर्शनाला आले असताना त्यांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारल्याने हा वाद सुरु झाला. गाभाऱ्यात प्रवेश असल्याने त्यांना अडवण्यात आले होते. यानंतर संभाजीराजेंनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला, मात्र तरीही त्यांना गाभाऱ्यात प्रवेश मिळाला नाही. यानंतर संभाजीराजे आणि शिवप्रेमी संतप्त झाले. छत्रपती घराण्यातील कोणताही सदस्य मंदिरात आला तर त्याला भवानी मातेच्या मंदिरात थेट प्रवेश दिला जातो. विधिवत मातेचे दर्शन त्यांना देण्यात येते. ही शेकडो वर्षांची परंपरा खंडित झाल्याने ग्रामस्थही संतप्त झाले. या प्रकाराबाबत मंदिर प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि मंदिर व्यवस्थापनाविरोधात शिवप्रेमी आणि नागरिकांनी बंदची हाक दिली.
(टीप – वरील माहिती ही तुळजाभवानी मंदिराची अधिकृत वेबसाईट, विकीपीडिया आणि इतर स्त्रोतांतून घेतलेली आहे. )