चहा-पोहे भजीचे दुकान चालवणारा व्यक्ती होणार मुख्यमंत्री, असा होता जीवन संघर्ष
MP New CM : मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्याआधीचा संघर्ष अनेकांना माहित नसतो. एखादा व्यक्ती जेव्हा एखाद्या मोठ्या पदावर पोहोचतो तेव्हा तो अचानक चर्चेत येतो. मुख्यमंत्रीपदी विराजमान होणाऱ्या अशाचे एका नेत्याचा संघर्ष आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यांनी शिक्षकांच्या मदतीने पीएचडीपर्यंत शिक्षण पूर्ण केले.

Madhya Pradesh CM : मध्य प्रदेशात भाजपचे आमदार मोहन यादव बुधवारी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मोहन यादव यांनी 1982 मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसोबत राजकारणात प्रवेश केला. 41 वर्षांपूर्वी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून सुरु झालेला राजकीय प्रवास आता मुख्यमंत्रीपदापर्यंत येऊन पोहोचला आहे. मोहन यादव यांच्या आयुष्यात देखील संघर्ष होता. त्या संघर्षानंतर त्यांना आज हे स्थान मिळाले आहे. पक्षात विविध पदांवर काम करुन ते मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले.
एकेकाळी विकायचे चहा पोहे
डॉ. मोहन यादव उज्जैन दक्षिण विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. मागील सरकारमध्ये ते राज्याचे उच्च शिक्षणमंत्री होते. 1965 मध्ये जन्मलेल्या मोहन यादव यांचे बालपण आर्थिक संकटात गेले. वडील पूनमचंद हे एका मिलमध्ये काम करायचे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी, पूनम चंद आणि त्यांचे भाऊ शंकर लाल यांनीही मालीपूर भागात चहा-पोहे भजीचे दुकान चालवले. वडिलांना आणि काकांना मदत करण्यासाठी मोहन तेथे याचचे. 1982 मध्ये मोहन यादव यांनी पहिली विद्यार्थी संघटनेची निवडणूक जिंकली तेव्हाही ते त्यांच्या चहाच्या दुकानात काम करत होते. चहा-पोह्याचं दुकान चांगलं चालू लागल्यावर त्यांनी ते वाढवलं आणि एक रेस्टॉरंट जोडलं.
घरच्यांच्या मदतीबरोबरच मोहन यादव यांनी अभ्यासातही पूर्ण लक्ष केंद्रीत केलं. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने एका शिक्षकाने त्यांना मदत केली. मोहन यादव यांना शिकवले. त्यांचा संपूर्ण खर्च उचलला. गरिबीतही शिक्षकांच्या मदतीने मोहन यादव यांनी पीएचडीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मोहन यादव यांनी उज्जैन विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष असताना राज्यशास्त्रात एमए आणि नंतर पीएचडीही केली. 2010 मध्ये त्यांना पीएचडीची पदवी मिळाली.
आतापर्यंत भूषवली विविध पदे
डॉ. मोहन यादव यांनी विद्यार्थी असल्यापासून राजकारणाला सुरुवात केली. 1982 मध्ये ते माधव विज्ञान महाविद्यालय विद्यार्थी संघाचे सहसचिव राहिले. त्यानंतर ते विद्यार्थी संघाचे अध्यक्ष झाले. 1984 मध्ये ते उज्जैनचे नगर मंत्री झाले. 1986 मध्ये विभागप्रमुख झाले. 1988 मध्ये मोहन यादव अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राज्य सह-सचिव आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते. 1989-90 मध्ये ते राज्य युनिटचे राज्यमंत्री आणि 1991-92 मध्ये राष्ट्रीय मंत्री झाले.
