ठाकरे गटाच्या गटनेतेपदावरच आक्षेप, हरीश साळवे यांच्या युक्तिवादाने ठाकरे गटाची कोंडी?; साळवे यांनी घटनाक्रमच सांगितला
उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगण्यात आलं होतं. पण ठाकरे यांनी बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच राजीनामा दिल्याचं साळवे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं.
नवी दिल्ली: राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी ठाकरे गटाचे कालचे सर्व मुद्दे खोडून काढण्यास सुरुवात केली आहे. साळवे यांनी ठाकरे गटाच्या गटनेतेपदावरच आक्षेप घेतला आहे. बंडानंतर ठाकरे गटाने अजय चौधरी यांना गटनेते म्हणून नियुक्त केले. पण त्यांची नियुक्ती बेकायदेशीर असून या नियुक्तीसाठी आवश्यक कोरम नव्हता, असा युक्तीवाद हरीश साळवे यांनी केला आहे. तसेच हा युक्तिवाद करताना सत्तांतर आणि बंडाबाबतचा घटनाक्रमच साळवे यांनी कोर्टाला ऐकवला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाची कोंडी होण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे राज्याच्या सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू आहे. ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी कॉन्फरन्सवरून युक्तिवाद करण्यास सुरुवात केली आहे. पक्षांतर बंदी कायद्यामुळे पक्षांतर थांबलेलं नाही. नबाम रेबिया प्रकरण महाराष्ट्रातील सत्तांतराशी लागू होत नाही. हा घटनात्मक प्रश्न आहे, असं हरीश साळवे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं.
बैठक बेकायदेशीर
यावेळी साळवे यांनी ठाकरे गटाचे विधानसभेतील गटनेते अजय चौधरी यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला. अजय चौधरी यांचं गटनेतेपद हे बेकायदेशीर आहे. उद्धव ठाकरे यांनी वर्षावर बैठक बोलावली होती. या बैठकीला फक्त 14 आमदार उपस्थित होते.
या आमदारांमार्फत अजय चौधरी यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली होती. मुळात कोरम नसताना ही बैठक बोलावण्यात आली. बैठक बेकायदेशीर होती. बैठकीनंतर सुनील प्रभू यांनी नोटीस काढली होती, असं हरीश साळवे यांनी स्पष्ट केलं. तसेच साळवे यांनी या काळातील घटनाक्रमच स्पष्ट केलं.
आधी आमदार अपात्र झाले
उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगण्यात आलं होतं. पण ठाकरे यांनी बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच राजीनामा दिल्याचं साळवे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. पण ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी साळवे यांचा हा युक्तीवाद खोडून काढला.
16 आमदारांना अपात्र केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याचं सिब्बल यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. तर, ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बहुमताचा दावा केल्याचं हरीश साळवे यांनी केला आहे.
या सुनावणीसाठी ठाकरे गटाकडून अनिल देसाई आणि अनिल परब कोर्टात उपस्थित आहेत. तर शिंदे गटाकडून खासदार राहुल शेवाळे उपस्थित आहेत.