Andhra Pradesh: आंध्रप्रदेशात नामांतराचा वाद चिघळला, संतप्त जमावाने मंत्री आणि आमदाराचं घरच पेटवलं; राज्यात जमावबंदी लागू
Andhra Pradesh: अमलापूरममध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आलं आहे, अशी माहिती गृहमंत्री टी. वनिता यांनी दिली आहे.
हैदराबाद: आंध्रप्रदेशात (Andhra Pradesh) जिल्ह्यांचं नाव बदलण्याच्या नावावरून सुरू झालेली हिंसा (Violence) अजूनही थांबताना दिसत नाही. जिल्ह्याचं नाव बदललं म्हणून संतप्त जमावाने मंत्री आणि आमदाराचं घरच पेटवून दिलं आहे. राज्यातील नव्याने निर्माण झालेल्या कोनासीमा जिल्ह्याचं नाव बदलून डॉ. बीआर आंबेडकर कोनासीमा जिल्हा (Dr Bhimrao Ramji Ambedkar Konaseema) असं नाव ठेवण्याचा प्रस्ताव आला होता. मात्र, या प्रस्तावाला येथील लोकांनी विरोध केला आहे. या प्रस्तावाच्या विरोधात मंगळवारी अमलापूरम नगरमध्ये हिंसक पडसाद उमटले. हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून जाळपोळ केली. सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड केली. त्यामुळे या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. काही संतप्त नागरिकांनी थेट मंत्री आणि एका आमदाराच्या घराच्या दिशेने कूच करून त्यांची घरेच पेटवून दिली. त्यामुळे त्यांचे बंगले धडाधडा पेटले. आगामुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते. आगीनंतरही लोक बंगल्याच्या दिशेने दगडफेक करत होते.
#WATCH | MLA Ponnada Satish’s house was set on fire by protestors in Konaseema district in Andhra Pradesh today, the protests were opposing the naming of the district as Dr BR Ambedkar Konaseema district pic.twitter.com/XzJskKqhz3
— ANI (@ANI) May 24, 2022
यावेळी पोलिसांनी संतप्त जमावावर जोरदार लाठीमार केला. त्यामुळे जमाव अधिकच खवळला. हा जमाव धावत धावतच राज्याचे मंत्री पी. विश्वरुपू आणि सत्ताधारी वायएसआर पक्षाचे आमदार पी. सतिशन यांच्या बंगल्याच्या दिशेने आला. जमावातील काही लोकांनी त्यांच्या घराच्या दिशेने दगडफेक केली. तर काही लोकांनी जाळपोळ करतानाच या दोन्ही नेत्यांच्या बंगल्यांना आगीच्या हवाली केलं. समाजकंटकांनी ही आग लावल्याचं सत्ताधारी पक्षाने सांगितलं. तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात राज्य सरकारला घोर अपयश आल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
20 पोलीस जखमी
विरोधकांनी लोकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. जमावाने केलेल्या दगडफेकीत 20 पोलीस जखमी झाले आहेत. तसेच आंदोलकांनी एक स्कूल बस जाळली आहे. त्यामुळे अमलापूरममध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आलं आहे, अशी माहिती गृहमंत्री टी. वनिता यांनी दिली आहे. एलरू रेंजचे पोलीस महासंचालक जी पाला राजू हे अमलापूरमला पोहोचले आहेत. त्यांनी परिस्थितीची माहिती घेतली. आता परिस्थिती नियंत्रणात आणली जात आहे. या हल्ल्यात काही पोलीस जखमी झाले आहेत. पण त्यांची प्रकृती उत्तम आहे, असं राजू यांनी सांगितलं.
म्हणून आंदोलन चिघळलं
कोनासीमा साधना समितीचे पदाधिकारी जिल्ह्याचं नाव बदलू नये म्हणून कलेक्टरला निवेदन द्यायला गेले होते. मात्र, पोलिसांनी या कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यापासून रोखलं. तसेच लाठीमार सुरू केला. त्यामुळे जमाव संतप्त झाला आणि त्यांनी दगडफेक, जाळपोळ केली. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.