सर्वात मोठी बातमी, अयोध्या रेल्वे स्टेशनचं नाव बदललं
अयोध्येत सध्या प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. अयोध्येतील राम मंदिरचं काम जवळपास पूर्ण झालंय. तसेच येत्या 22 जानेवारीला मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी सुरु आहे. असं असताना राम मंदिराच्या उद्घाटनाच्या आधी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अयोध्या जंक्शन रेल्वे स्टेशनचं नाव आता बदलण्यात आलं आहे.
अयोध्या | 27 डिसेंबर 2023 : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या आधी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अयोध्या जंक्शन रेल्वे स्टेशनचं नाव बदलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यापुढे अयोध्या रेल्वे स्थानकाचं नाव अयोध्या धाम असं असणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोन दिवसांपूर्वी अयोध्या धाम स्टेशन नाव ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे विभागाच्या या निर्णयामुळे राम भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पुढच्या महिन्यात 22 जानेवारीला रामलल्लांचा भव्य प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला लाखो भाविकांची उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमासाठी अयोध्येत सध्या जोरदार तयारी देखील केली जात आहे. या कार्यक्रमात स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सहभागी होणार आहेत.
अयोध्या रेल्वे स्टेशनचं नुतनीकरण करण्यात आलं आहे. या रेल्वे स्टेशनला बघून आपल्याला भव्य मंदिराचा भास होईल. रेल्वे स्थानकापासून राम मंदिर एक किलोमीटर अंतारावर आहे. या रेल्वे स्टेशनची 50 हजार प्रवाशांची क्षमता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबरला नुतनीकरण करण्यात आलेल्या रेल्वे स्थानकाचं उद्घाटन करणार आहेत. या रेल्वे स्थानकाच्या नुतनीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. प्रवाशांसाठी आधुनिक सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय कडक सुरक्षेचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी या दिवशी श्रीराम इंटरनॅशनल एयरपोर्टचं देखील लोकार्पण करणार आहेत.
मोदींच्या दौऱ्याआधी घेण्यात आला निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 30 डिसेंबरला अयोध्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते अयोध्या जंक्शन रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकसित नव्या भवनचं उद्घाटन करणार आहो. तसेच अयोध्या ते दिल्ली वंदे भारत ट्रेनचं लोकार्पण करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या आधी अयोध्या जंक्शन रेल्वे स्थानकाचं नामांतर अयोध्या धाम असं करण्यात आलं आहे. अयोध्या रेल्वे स्थानकांवर मोदींचा कार्यक्रम जवळपास अर्धा तास चालणार आहे. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभाग चांगलंच कामाला लागलं आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये फैजाबाद जंक्शनचं नाव बदलून अयोध्या कँट असं ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्याकडून याबाबतचा प्रस्तावही केंद्राकडे पाठवण्यात आला होता. फैजाबाद येथे छावणी क्षेत्रात असणाऱ्या सैनिकांच्या सन्मानासाठी कँट शब्द जोडण्यात आला होता.