Ram Mandir: राम मंदिराच्या गर्भगृहात श्यामवर्णी रामलला? तीन मूर्तींपैकी एकाची मतदानाने निवड
Ayodhya Ram Mandir | अयोध्येत राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी रोजी होत आहे. हा सोहळा 16 जानेवारीपासून सुरु होऊन सात दिवस राहणार आहे. आता राम मंदिरात कोणती मूर्ती विराजमान होणार? यासाठी मतदान घेण्यात आले. त्या मतदानानुसार श्यामवर्णी रामलला पसंती दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अयोध्या, दि. 30 डिसेंबर 2023 | अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाची जोरदार तयारी सुरू आहे. त्यापूर्वी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या रेल्वे स्टेशन आणि विमानतळाचे लोकार्पण करणार आहेत. राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला देशभरातून लोकांना बोलवण्यात आले आहे. येत्या 22 जानेवारी रोजी रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा राम मंदिराच्या गर्भगृहात होणार आहे. त्यावेळी गर्भगृहात फक्त पाचच लोक असणार आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत आणि मंदिराचे मुख्य पुजारी असणार आहेत. या मंदिरात विराजमान करण्यासाठी तीन मूर्तीं तयार करण्यात आल्या होत्या. त्यापैकी एका मूर्तीची निवड मतदानाने करण्यात आली आहे. या मतदानाचा निकाल पाच ते दहा जानेवारी दरम्यान होणार आहे. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्यामवर्णी रामलला सर्वांची पसंती मिळाली आहे.
राम मंदिरासाठी तीन मूर्ती, गुप्त मतदान
राम मंदिरात विराजमान करण्यासाठी एकाच वेळी तीन मूर्ती तयार करण्यात आली. ट्रस्टच्या सदस्यांनी शुक्रवारी गुप्त मतदान करुन एका मूर्तीची निवड केली. मतदानाचा निर्णय ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपालदास यांनी अजून जाहीर केला नाही. या मतदानाचा निकाल पाच ते दहा जानेवारी रोजी येणार आहे. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्यामवर्णी रामललाची मूर्ती गर्भगृहात विराजमान होणार आहे. या मूर्तीला अनेक सदस्यांची पसंती मिळाली आहे. ही मूर्ती अरुण योगीराज यांनी केली आहे. कर्नाटकमधील श्याम शिळेतून ही मूर्ती तयार केली आहे. अन्य दोन मूर्ती गणेश भट्ट आणि सत्यनारायण पांडेय यांनी तयार केली आहे. तीन मूर्तींची उंची 51-51 आहे. या मूर्तींना आठ फूट ऊंच आधारावर स्थापित केली आहे.
तीन मूर्ती अयोध्यच्या मंदिरात
तीन मूर्तीपैंकी एक मूर्ती गर्भगृहात असणार आहे. उर्वरित दोन मूर्ती इच्छूक भक्तांना देण्याचा विचार झाला होता. परंतु आता तीन मूर्ती अयोध्येतील राम मंदिरात वेगवेगळ्या ठिकाणी विराजमान करण्यात येणार आहे. मूर्तीसाठी मतदान करणाऱ्यांमध्ये ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपालदास, कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज, महासचिव चंपतराय, राम मंदिर समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र, स्वामी वासुदेवानंद सरस्वती, युगपुरुष स्वामी परमानंद, अयोध्या राजा बिमलेंद्रमोहन मिश्र, डॉक्टर अनिल मिश्र, कामेश्वर चौपाल, महंत दिनेंद्रदास, केंद्र सरकारचे आयएएस अधिकारी ज्ञानेश कुमार, उत्तर प्रदेश सरकारचे अपर मुख्य सचिव संजय प्रसाद, जिल्हाधिकारी नितीश कुमार यांनी मतदान केले.