उत्तर प्रदेश : फतेहगंज पश्चिम येथे एक मुलगी रस्त्याच्या कडेला अवस्थेत काही लोकांना दिसली. तिच्या अंगावर कमी कपडे होते. लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मुलीला उचलून तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले. दरम्यान, मुलीने एका कागदावर स्वतःची आणि कुटुंबाची माहिती लिहून दिली. पोलिस जेव्हा ही माहिती लिहून घेत होते तेव्हा त्यांचाही आत्मा हादरला. तिने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी मुलीचे वडील आणि मेहुण्याला अटक केली आहे. विशेष म्हणजे अवघ्या 48 तासांपूर्वी त्या मुलीच्या वडिलांनी तिचे हात पिवळे केले होते.
उत्तर प्रदेशातील बरेली येथील फतेहगंज भागात ही घटना घडली. 22 एप्रिलला थाना शाही गावात एका लग्नाची धामधूम सुरु होती. मुलीचे आई-वडील, भाऊ, मोठी बहीण लग्नसराईत मिरवत होते. पण, नवरी मुलगी मात्र मनातून प्रचंड नाराज होती. कारण तिचे गावातीलच एका मुलावर प्रेम जडले होते आणि त्याच्याशीच तिला संसार थाटायचा होता.
तिच्या कुटुंबीयांना तिचे हे प्रेम प्रकरण मान्य नव्हते. साधारण वर्षभरापूर्वी ती मुलगी गावातील ‘त्या’ तरुणासोबत घर सोडून गेली होती. काही दिवसांनी ती परत आली. घरात प्रेम प्रकरणाची माहिती झाली. घरच्यांचा विरोध झुगारून ते दोघे भेटतच होते. गावात एकच चर्चा सुरु झाली. त्यामुळे कुटुंबाने तिचे लग्न लावण्याचा निर्णय घेतला.
लग्नाला विरोध असतानाही कुटुंबाने जबरदस्तीने 22 एप्रिलला तिचे लग्न लावून दिले. लग्न होऊन मुलगी सासरी आली. पण, सासरी आल्यानंतरही ती सतत आपल्या प्रियकरासोबत फोनवर बोलायची. याची माहिती मिळताच तिचे वडील संतापले. मुलीला घरी आणण्याचा बहाणा करून ते 24 एप्रिलला वडील आणि मेव्हणे सासरच्या घरी पोहोचले.
त्यांनी रात्री तिथेच मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी मुलीला घरी आणत असताना वाटेतच वडिलांनी तिला बेदम मारहाण केली. तिच्या तोंडात कपडा भरून तिच्या अंगावर केमिकल टाकून तिला जाळले. ती आरडाओरड करू नये म्हणू त्यांनी तिच्या तोंडातही केमिकल टाकले. यादरम्यान मेहुण्यानेही तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला तशाच अवस्थेत सोडून ते निघून गेले.
ती पीडित 22 वर्षीय मुलगी आता हॉस्पिटलमध्ये आयुष्याची झुंज देत आहे. पीडित मुलीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तिच्या वडिलांना आणि मेहुण्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.