छोटीमोठी चोरी नाही, सुरूंग खोदून थेट अख्खं इंजिनच पळवलं ! कोणत्या शहरात घडलीय ही डेंजर चोरी?
काही दिवसांपूर्वी पूर्णिया जिल्ह्यातही अशीच चोरी उघड झाली होती. चोरांनी विंटेज मीटर गेज स्टीम इंजिनच विकलं होतं. स्थानिक रेल्वे स्थानकात हे इंजिन प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं.
रोहतास: बिहारमध्ये एक अनोखी चोरी उघड झाली आहे. रोहतासमध्ये लोखंडाचा 500 टन वजनी पूलच गायब केल्यानंतर आता चोरांनी आणखी एक प्रचंड मोठी चोरी केली आहे. त्याबद्दल तुम्ही ऐकाल तर तुम्हालाही धक्का बसेल. चोरांनी सुरूंग खोदून रेल्वेचं अख्ख इंजिनच पळवल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. त्यामुळे सर्वच हैराण झाले असून या चोरीमुळे पोलिसांचं डोकंही गरगरलं आहे. मुझफ्फरपूर येथे भंगाराच्या दुकानात एका बॅगेत ट्रेनच्या इंजिनचे काही सुटे भाग सापडले. त्यानंतर ही चोरीची घटना समोर आली आहे.
गेल्या आठवड्यात बरौनी (बेगूसराय जिल्हा)च्या गरहारा यार्डात रेल्वेचं डिझेल इंजिन दुरुस्तीसाठी आणण्यात आलं होतं. हे संपूर्ण इंजिनच चोरांच्या टोळीने पळवलं आहे. पोलिसांनी तीन लोकांना अटक केली. त्यानंतर त्यांच्याकडील माहितीच्या आधारे मुझफ्फरपूर येथील प्रभात कॉलनीतील भंगाराच्या गोदामात जाऊन इंजिनच्या सुटे भाग भरून ठेवलेल्या 13 गोण्या जप्त केल्या.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या यार्डाच्या बाजूला आम्हाला सुरुंग सापडलं. या सुरूंगातून चोर येत होते. इंजिनचे काही भाग काढायचे आणि गोण्या भरून भरून सुटे भाग घेऊन जायचे. रेल्वे अधिकाऱ्यांना तर त्याबाबतची काहीच माहिती नव्हती, असं एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं.
काही दिवसांपूर्वी पूर्णिया जिल्ह्यातही अशीच चोरी उघड झाली होती. चोरांनी विंटेज मीटर गेज स्टीम इंजिनच विकलं होतं. स्थानिक रेल्वे स्थानकात हे इंजिन प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. मात्र, चौकशी केल्यानंतर हे इंजिन चोरी गेल्याचं दिसून आलं आहे. समस्तीपूर डिव्हिजनच्या डिव्हिजनल मॅकेनिकल इंजिनियरकडून देण्यात आलेल्या बनावट पत्राच्या आधारे हे इंजिन विकण्यात आलं आहे.
तसेच काही दिवसांपूर्वी बिहारच्या उत्तर पूर्वेकडील अररिया जिल्ह्यातील सीताधार नदीवरील पुलाचं कुलूप चोरांनी उघडलं होतं. त्यानंतर या पुलाचे काही भाग चोरांनी गायब केले होते. त्यानंतर आता हा दुसरा धक्कादायक प्रकार उजेडात आल्याने बिहारमध्ये एकच खळबळ उडाली आहे.