950 कोटींचा चारा घोटाळा, 28 वर्षांनंतर रिकव्हरी, लालू यादव असो की अन्य कोणी, संपत्ती जप्त…
Lalu Prasad Yadav chara ghotala scam: चारा घोटाळ्याशी संबंधित लोकांची मालमत्ता जप्त केली जाईल. घोटाळ्याची 950 कोटींची रक्कम जप्त करून सरकारी तिजोरीत जमा करण्यात येणार आहे. सरकारचा पैसा सरकारकडे परत आणावा लागेल.

Lalu Prasad Yadav chara ghotala scam: बिहारमध्ये आता विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी चारा घोटाळ्यातील रक्कम 950 कोटी रुपयांची वसुली करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही रक्कम वसूल करुन सरकारच्या तिजोरीत भरण्यात येणार आहे. या प्रकरणात बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी पक्षाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी शिक्षा झाली आहे.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री
बिहारचे उपमुख्यमंत्री अन् अर्थमंत्री सम्राट चौधरी म्हणाले की, चारा घोटाळ्याशी संबंधित लोकांची मालमत्ता जप्त केली जाईल. घोटाळ्याची 950 कोटींची रक्कम जप्त करून सरकारी तिजोरीत जमा करण्यात येणार आहे. सरकारचा पैसा सरकारकडे परत आणावा लागेल. न्यायालयाचा हा निर्णय असून त्याआधारे कारवाई केली जाणार असल्याचे सम्राट चौधरी यांनी सांगितले..
उपमुख्यमंत्री चौधरी म्हणाले, लालू यादव असोत की अन्य कोणीही, ज्यांनी घोटाळा केला आहे, त्यांची मालमत्ता जप्त करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. हा न्यायालयाचा निर्णय आहे, सरकारचा निर्णय नाही. त्यावर कारवाई करायचीच असेल तर सरकार त्यावर कारवाई करेल, असे न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले होते, आता त्याला 28 वर्षे झाली आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणात शिक्षा दिली आहे. न्यायालयाने मालमत्ता जप्त केली आहे. आता ती संपत्ती सरकारी तिजोरीत टाकले जाईल.
चारा घोटाळा हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. जेव्हा बिहार आणि झारखंड एकच राज्य होते तेव्हाचे हे प्रकरण आहे. हा प्रकार पशुसंवर्धन विभागाशी संबंधित होते. या घोटाळ्यात पशुखाद्य आणि पशुसंवर्धनाशी संबंधित खोट्या दाव्यांद्वारे सरकारी तिजोरीतून मोठ्या रकमेचा अपहार करण्यात आला. 940-950 कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचे सांगितले जाते. हा घोटाळा प्रामुख्याने 1990 च्या दशकात झाला होता. यावेळी लालू प्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री होते. हे प्रकरण 1996 मध्ये उघड झाले होते. या प्रकरणाचा तपास सीबीआयने केला होता. या प्रकरणात 66 खटले दाखल करण्यात आले होते. त्यात 170 आरोपी होते.