Boat Capsizes : मुलांना शाळेत घेऊन जाणारी बोट उलटली, 34 पैकी 18 मुले बेपत्ता
मुलांना शाळेत घेऊन जात असताना बोट नदीत उलटल्याने अनेक विद्यार्थी बेपत्ता झाले आहेत. नदीचा प्रवाह अधिक असल्याने मुलांना शोधण्यात अडथळे येत आहेत.
पाटना, १४ सप्टेंबर २०२३ : बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. नदीवर पूल नसल्याने मुले नदीच्या त्या बाजुला बोटीने शाळेत जात असत. पण आज मुलांना शाळेत घेऊन जात असताना बोट पाण्यात उलटली. या घटनेनंतर 18 मुले बेपत्ता आहेत. बोटीत एकूण 34 मुले होती. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. बागमती नदीत मुले वाहून गेल्याची माहिती आहे. भटगामा मधुरपट्टी येथील पीपळ घाटातून मुले शाळेत जात असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच काही स्थानिक लोकांनी नदीत उड्या घेत मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अनेक मुलांना पाण्यातून बाहेर काढले आहे. पण अजूनही अनेक मुले बेपत्ता आहेत. घटनेनंतर घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी झाली. नदीचा प्रवाह जास्त असल्याने मुलांना बाहेर काढण्यात अडचणी येत आहेत.
या घटनेनंतर स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. वर्षानुवर्षे नदीवर पूल बांधण्याची मागणी करत आहे. मात्र त्यांची मागणी मान्य न झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या बोटीत लहान मुलांसह काही महिलाही होत्या.
मुलांना शाळेत घेऊन जाणारी बोट उलटल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.