Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी; यूट्यूब पाहिला अन् विद्यार्थ्याने…
अयोध्येतील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा 24 जानेवारी 2024 ला होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यापूर्वीच अयोध्येत खळबळ उडवून देणारी एक घटना घडली आहे.
नवी दिल्ली | 20 सप्टेंबर 2023 : अयोध्येतील राम मंदिराचं येत्या 24 जानेवारी 2024 रोजी लोकार्पण होत आहे. त्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. लोकार्पणाच्या दृष्टीनेही तयारी केली जात आहे. त्यामुळे लोकार्पण सोहळ्याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. अनेक वर्षाच्या संघर्षानंतर अखेर अयोध्येत राम मंदिर उभं राहत असल्याने या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी देशभरातून राम भक्त येणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मात्र राम मंदिर उडवण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका विद्यार्थ्याने या धमकीची सूचना दिली आहे. या धमकीनंतर पोलिसांच्या तोंडचं पाणीच पळालं आहे.
येत्या 21 सप्टेंबर रोजी राम मंदिरात बॉम्ब स्फोट होणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या 112 या फोनवर धमकीची सूचना देण्यात आली आहे. या धमकीच्या माहितीनंतर उत्तर प्रदेश पोलीसच नाही तर केंद्रीय एजन्सीमध्येही खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तात्काळ ही सूचना देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला. तेव्हा एका बरेलीतील एका विद्यार्थ्याने ही माहिती दिल्याचं समोर आलं आहे.
अयोध्येत अलर्ट
या विद्यार्थ्याने पोलिसाला जी माहिती दिली ती अधिकच धक्कादायक होती. या विद्यार्थ्याने मंगळवारी यूट्यूबवर एक व्हिडीओ पाहिला होता. याचवेळी त्याने एक व्हिडीओ पाहिला. त्यात 21 सप्टेंबर रोजी मंदिर बॉम्बने उडवून देण्यात येणार असल्याचं म्हटलं गेलं. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पोलिसांना त्याची माहिती द्यावी असं मनात आलं. त्यामुळे मी पोलिसांना त्याची माहिती दिली, असं या विद्यार्थ्याचं म्हणणं आहे. पोलिसांच्या मते जशीही आम्हाला कंट्रोल रूममध्ये सूचना आली, त्यानंतर लगेच अयोध्येत अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
लगेच नाकाबंदी
त्यानंतर लगेच नाकाबंदी करण्यात आली असून चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच कंट्रोल रुमला फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला गेला. चौकशी केली असता हा फोन कॉल बरेली येथील फतेहगंज पूर्व येओथील इटौरी गावातून हा फोन आल्याचं समजलं. त्यानंतर पोलीस या पत्त्यावर पोहोचले. तिथे गेल्यावर फोन करणारा दुसरा तिसरा कोणी नसून आठवीचा विद्यार्थी निघाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन त्याची चौकशी केली. त्यावेळी त्याने यूट्यूबवर हा धमकीचा व्हिडीओ पाहिल्याचं त्याने सांगितलं.
तो एवढंच म्हणाला…
या मुलाने कंट्रोल रुमला फोन केला होता. राम मंदिरात 21 सप्टेंबर रोजी बॉम्बस्फोट होणार आहे, एवढंच तो म्हणाला होता. त्यानंतर कंट्रोल रुमने या मुलाशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्याने फोन कट केला. त्यामुळे संशय अधिकच वाढला. दरम्यान, पोलीस या मुलाची चौकशी करत आहे. तसेच यूट्यूबवरील तो व्हिडीओही तपासत आहे.