बहिणीची चिता पेटून एक मिनिटही झाला नव्हता, त्याने जळत्या चितेतच… स्मशानभूमीतील धक्कादायक प्रकाराने सर्वच हादरले
राजस्थानमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. बहिणीच्या मृत्यूचं दु:ख अनावर झाल्याने एका भावाने स्वत:ला जळत्या चितेच्या हवाली केलं. तो शंभर टक्के भाजला आहे.
जयपूर : राजस्थानच्या भिलवाडामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. बहिणीच्या निधनाचं दु:ख अनावर झाल्याने भावाने चक्क जळत्या चितेत उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे स्मशानभूमीत एकच खळबळ उडाली. नातेवाईक आणि परिसरातील नागरिक हादरून गेले, लोकांनी तात्काळ त्याला जळत्या चितेतून बाहेर काढले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याचं संपूर्ण शरीर जळून गेलं आहे. त्याच्यावर युद्धपातळीवर उपाचर सुरू असल्याचं सांगण्यात आलं. मात्र, या घटनेमुळे भिलवाड्यात खळबळ उडाली आहे.
बागोर येथील मांकियास गावात ही धक्कादायक घटना घडली. या गावातील मीना नावाच्या तरुणीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तिच्या पार्थिवावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रितीरिवाजानुसार तिला अखेरचा निरोप देण्यात आला. तिच्या चितेला अग्नी देणअयात आला. चिता पेटल्याने सर्वजण थोड्या दूर अंतरावर जाऊन बसले.
अन् अचानक
जवळचे नातेवाईक चितेजवळच उभं राहून एकमेकांचं सांत्वन करत होते. घरातील मंडळींचे तर रडून रडून हाल झाले होते. या तरुणीचा चुलत भाऊ सुखदेव भील हा सुद्धा चितेजवळ बसलेला होता. तो तिथेच बसून प्रत्येकाचं बोलणं ऐकत होता. त्यालाही दु:ख अनावर झालं होतं. तोही हमसून हमसून रडत होता. तेवढ्यात त्याला काय झालं माहीत नाही. त्याने अचानक पळत पळत जाऊन जळत्या चितेत उडी घेतली.
शंभर टक्के जळाला
सुखदेवने अचानक चितेत उडी घेतल्याचं पाहून स्मशानभूमीत एकच खळबळ उडाली. नातेवाईक, गावकरी घाबरून गेले. काही लोकांनी तात्काळ पुढे येऊन सुखदेवला चितेतून बाहेर काढले. त्यानंतर उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुखदेव शंभर टक्के भाजला आहे. त्याची स्थिती गंभीर आहे, असं त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं.
बहिणीवर प्रचंड माया
सुखदेवचं आपल्या बहिणीवर प्रचंड प्रेम होतं. मीनाच्या मृत्यूमुळे तो कोलमडून गेला होता. मृत्यूनंतरही मीनाला एकटं सोडण्यास तो तयार नव्हता. त्यामुळेच त्याने स्वत:ला चितेत झोकून दिल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे.