वाघनखांचा इतिहास अन् सातारा ते लंडन प्रवासाची रंजक कथा
वाघनखे नेमकी असतात कशी? त्याचा वापर कधीपासून सुरु झाला? अफजलखान भेटीसाठी शिवाजी महाराजांनी वाघनखेच का वापरली? शिवकालीन वाघनखे लंडनमध्ये कशी गेली? वाघनखांसंदर्भात विविध इतिहास संशोधक काय म्हणतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात मराठी माणसालाच नाही तर देशातील प्रत्येकाला कुतूहल आहे. त्यांच्यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याची उत्कंठा आहे. त्यामुळेच महाराजांवरील अनेक पुस्तके जिज्ञासू पालथी घालत असतात. गडकिल्ल्यांवर भटकंती करत असतात. मोजक्या सैन्यांसह महाराजांनी उभारलेले हिंदवी स्वराज्य म्हणजे जगातील सर्वांसाठी अभ्यासाचा विषय राहिला आहे. त्यांच्या समोर अनेक प्रबळ शत्रू असताना महाराजांनी सर्वांना नामोहरण करुन ठेवले होते. यामुळे शेकडो वर्षानंतरही आजही शिवाजी महाराजांची युद्धनीती त्यांनी उभारलेले आरमार हे संशोधनाचा विषय ठरत आहे. शिवाजी महाराज यांच्या जीवनात त्यांच्यासमोर नेहमीच संकटांची मालिका होती. परंतु त्यातून ते आपल्या बुद्धिमत्ता आणि चातुर्यामुळे बाहेर पडत राहिले. शिवाजी महाराजांची आग्रातून सुटका आणि अफजलखानसारख्या बलाढ्य शूत्रचा पराभव हे महाराजांच्या जीवनातील सर्वात आव्हानाचे क्षण म्हटले जातात. अफजलखानसारख्या शत्रूला मारण्यासाठी शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखांसंदर्भात सर्वांना कुतूहल आणि उत्कंठा लागलेली असते. लंडनमधून शिवकालीन वाघनखे भारतात आली आहेत. आता तीन वर्षे वाघनखे राज्यात असणार आहेत. ही वाघनखे नेमकी असतात कशी? त्याचा वापर कधीपासून सुरु झाला? अफजलखान भेटीसाठी शिवाजी महाराजांनी वाघनखेच का वापरली? शिवकालीन वाघनखे लंडनमध्ये कशी गेली? वाघनखांसंदर्भात विविध इतिहास संशोधक काय म्हणतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या…
विजापूर दरबारात अफजलखानने विडा उचलला
छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करून आदिलशहाला आव्हान देण्यास सुरुवात केली होती. मुघल शासक औरंगजेबही शिवाजी महाराजांच्या वाढत्या साम्राज्यामुळे जेरीस आला होता. त्यामुळे त्याने विजापूर संस्थांनशी हात मिळवले होते. औरंगजेबने शिवाजी महाराज यांना सर्वात धोकादायक शूत्र म्हटले होते. विजापुरात सुलतान म्हणून अली आदिल शाह होता. तो कमी वयाचा होता. त्यामुळे त्याची सावत्र आई बडी बेगम राज्यकारभार चालवत होती. ती शिवाजी महाराजांना शत्रू समजत होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याचा तिने चंग बांधला होता. विजापूरच्या दरबारात शिवाजी महाराजांना मारण्यासाठी तिने विडा ठेवला. त्यावेळी दरबारात स्मशान शांतता पसरली. कोणी पुढे येत नव्हते. विजापूरची सेना मोठी होती. सैन्यबळ प्रचंड होते. परंतु शिवाजी महाराजांशी पंगा घेणे म्हणजे वाघाच्या जबड्यात हात टाकणे होते, हे त्या ठिकाणी असलेल्या सर्वांना माहीत होते. महाराजांसमोर जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे आहे, यासंदर्भातील किस्से दरबारातील प्रत्येकापर्यंत आले होते. त्यामुळे कोणीच पुढे येत नव्हते. त्यावेळी प्रचंड धिप्पाड असलेला अफजलखान समोर आला. त्याने हा विडा उचलला. या अफजलखान यानेच शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराजांना अटक केली होती. तसेच शिवाजी महाराजांचे भाऊ संभाजी महाराज यांना कर्नाटकच्या लढाईत ठार केले होते.
प्रतापगडावर भेट ठरली, तयारी पूर्ण झाली
अफजल खान क्रूर होता. त्याने अनेकांना दगा फटका करून ठार केले होते. त्यामुळे अफजलखान म्हणजे स्वराज्यावर आलेले सर्वात मोठे संकट होते. कारण ताकद, राजकीय बुद्धिमत्ता आणि भयंकर क्रूरता या तीनही गोष्टींचा संगम अफजलखान याच्याकडे होता, हे शिवाजी महाराजांनी चांगलेच ओळखले होते. बंगाली इतिहासकार जदुनाथ सरकार आपल्या ‘शिवाजी एंड हिज टाइम्स’ (Shivaji and His Times) पुस्तकात शिवाजी महाराजांचे बालपण, त्यांचे सुरुवातीचे विजय, मुघल आणि आदिल शाह यांच्याबरोबर त्यांचे युद्ध या घटनांचा तपशीलवार वर्णन केला आहे. ते आपल्या पुस्तकात लिहितात, अफजलखानने विजापूर दरबारात शिवाजी महाराजांना पकडण्याचा विडा उचलला. शिवाजी महाराजांना बंदी करुन दरबारात आणेल. त्यासाठी मला आपल्या घोड्यावरुनसुद्धा उतरावे लागणार नाही, अशी गर्जना केली होती.
कवींद्र परमानंद आपले पुस्तक ‘श्री शिवभारत’मध्ये लिहितात, 10 नोव्हेंबर 1659 रोजी शिवाजी महाराज आणि अफजलखान यांची भेट ठरली. प्रतापगडाच्या माचीवर त्यासाठी शामियाना उभारण्यात आला. भेटीपूर्वी वकिलांच्या चर्चा झाल्या. भेटीच्या वेळी किती सैनिक येणार हे ठरले. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखानसोबत कोण असणार? हे ठरण्यात आले. अफजलखानसोबत शामियानात दोन जण असणार होती. तसेच आपली शस्त्रे आणण्याची परवानगी होती. शिवाजी महाराजांनाही तशीच परवानगी होती.
शिवाजी महाराजांनी अशी केली होती तयारी
शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या भेटीचा दिवस उजाळला. शिवाजी महाराजांनी आपल्या संरक्षणासाठी चिलखत आणि शिरस्त्राण घातले होते. एक कटार (बिचवा) महाराजांनी ठेवला होता. तसेच डाव्या हातात वाघनखे घातली होती. ही वाघनखे रुस्तुमे जमाल या मुस्लीम व्यक्तीने महाराजांना तयार करुन दिल्याचे म्हटले जाते. परंतु त्यासंदर्भात ऐतिहासिक पुरावा नाही. इतिहासकार इंद्रजित सावंत म्हणतात, शिवाजी महाराज प्रत्येक गोष्टीचा किती सूक्ष्म विचार करत होते, हे त्यांच्या या तयारीवरुन दिसते. कधी कोणते शस्त्र वापरायचे याची माहिती शिवाजी महाराजांना चांगलीच होती. एखाद्या गोष्टीकडे बघताना महाराज किती बारकाईने आणि अभ्यासपूर्ण पाहत होते. हे आपणास या घटनेतून दिसते. अफजलखान याला आपल्या मनगटाच्या ताकदीवर आपण पराभूत करु शकत नाही, हे महाराजांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी युक्ती काढली. वाघनखे ही विचारपूर्वक सोबत ठेवली होती. अफजलखानच्या भेटीसाठी जाताना शिवाजी महाराजांसोबत जीवा महाले आणि संभाजी कावजी होते.
‘मराठाज् अँड दख्खनी मुसलमान’ या पुस्तकात आर. एम. बेंथम यांनी म्हटले आहे की, अफजलखानच्या भेटीसाठी निघताना शिवाजी महाराजांनी अंगरखा घातला. टोपीखाली लोखंडी शिरस्त्राण ठेवले होते. उजव्या हाताच्या कोपऱ्यात त्यांनी छोटी कट्यार (बिचवा) लपवला होता. तर डाव्या हाताच्या बोटांमध्ये वाघनखे हे छोटे शस्त्र बेमालूमपणे दडवून ठेवले होते. अफजलखानाने आपल्या अंगात फक्त अंगरखा (झगा) घातला होता. त्याने शिवरायांनी जशी चिलखत घालून आपल्या संरक्षणाची व्यवस्था केली होती तशी केलेली नव्हती. तो निर्धास्त होता. शिवाजी महाराजांनी त्याला आधीच आपण खूप घाबरलेलो आहोत, असे दाखवले होते.
शिवाजी महाराजांनी केला वाघनखांचा वापर
अफजलखान आणि शिवाजी महाराज यांची भेट 10 नोव्हेंबर 1659 रोजी ठरली. त्या दिवशी प्रतापगडावर उभारलेल्या शामियानात शिवाजी महाराज आले. छत्रपती शिवाजी महाराजांची अफजलखाने गळाभेट घेतली. त्याने आपल्या काखेत महाराजांना दाबून वार केला. परंतु महाराजांनी चिलखत घातले होते. त्यामुळे ते वाचले. खानने दगा केलेला पाहून शिवाजी महाराजांनी लपवलेली वाघनखे काढली अन् खानाच्या पोटात घुसवून त्याचा कोथळा बाहेर काढला. पोटावरची त्वचा नाजूक असते. त्यामुळे अफजलखान गंभीर जखमी झाला. त्यानंतर शिवाजी महाराजांनी बिचव्याने हल्ला केल्याचे म्हटले जाते. त्यावेळी अफजलखानसोबत असणारा कुष्णाजी कुलकर्णी आणि सैय्यद बंडा धावत आला. सैय्यद बंडा पट्टा चालवण्यात कुशल होता. दहा तलवार बाज एक पट्टेबाज असे म्हटले जाते. त्याने शिवाजी महाराजांवर हल्ला केला. परंतु जीवा महाले याने त्याला यमसदनी पाठवले. त्यानंतर ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ ही म्हण प्रसिद्ध झाली. गंभीर जखमी झालेला अफजलखान पळून जात होतो. त्यावेळी शिवाजी महाराजांसोबत असलेल्या संभाजी कावजीने त्याचे शिर कापले.
अफजलखानला ठार केल्यानंतर मनूची शिवाजी महाराजांना भेटला होता. त्याने वाघनखाची नोंद करुन ठेवल्याचे इतिहासकार इंद्रजित सावंत म्हणतात. मनुची यांनी लिहिले आहे की, शिवाजी महाराजांनी एक अणकुचीदार अग्र तयार करून घेतले होते. त्याच्या टोकाला अंगठीचा आकार देऊन त्यावर खडा बसवला होता. ही अंगठी बोटात घातली की ते अग्र हातात लपवता येते. अफजलखान उंच व बराच धिप्पाड असल्यामुळे शिवाजी महाराजांचे हात त्यांच्या हातांच्या खाली होते. महाराजांनी जोराने अफजलखानाचे पोट डावीकडून उजवीकडे फाडले. त्यामुळे अफजलखानाची आतडी बाहेर आली.
वाघनखांचा इतिहास काय?
वाघनखे या हत्याराची कल्पना मानवास वाघांच्या नखावरुनच सुचली आहे. हे फार जून हत्यार आहे. त्याचा उल्लेख ऋग्वेदामध्ये आहे. हे नाव वाघाच्या नखावरुन दिले आहे. परंतु वाघनखे म्हणजे वाघाच्या नखांपासून तयार केलेले शस्त्र नाही. वाघ आपली नखे पाहिजे तेव्हा लपवून ठेवतो आणि हल्ल्याच्या वेळी तो बाहेर काढतो. आपल्या घरातील मांजर असे करु शकतो. सगळ्यात लहान परंतु सगळ्यात घातक शस्त्र म्हणजे वाघनखे आहेत. त्याचा उपयोग प्राणघातक नसला, तरी एखाद्याला जायबंदी करण्यासाठी निश्चितच त्याचा वापर होऊ शकतो. ते डाव्या हातात वापरले जाते. वाघनखे या हत्याराचा वापर छत्रपती शिवाजी महाराज यांनी करुन अफजलखानचा कायमचा बंदोबस्त केला. त्यामुळे हे शस्त्र लोकप्रिय झाले. त्याला विष लावून वापरले जाते. जुन्या काळी राजपूत स्त्री आपल्याकडे वाघनखे ठेवत होत्या. शीख योद्धेही वाघनखे आपल्या पगडीत ठेवत असल्याचे उल्लेख अनेक ठिकाणी येतो.
वाघनखे दिसायला वाघाच्या नखांसारखी असतात. ती पोलादी धातूची असतात. एका पट्टीवर वाघाच्या नखांप्रमाणे धातूची अणुकुचिदार चार किंवा पाच नखे बसवलेली असतात. दोन बोटांमध्ये अंगठीप्रमाणे ते घालता येते. त्यामुळे वाघनखे घालून मूठ बंद केली जाते तेव्हा आंगठीसारखी दिसतात. ती हातात लपवून त्याच्याद्वारे शत्रूला मारता येते.
साताऱ्यातील वाघनखे लंडनला कशी पोहचली
ब्रिटिश सैनिक आणि इस्ट इंडिया कंपनीचा प्रतिनिधी जेम्स ग्रँट डफ हा इतिहासकार होता. त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याच्या स्थापनेपासून पेशवाईच्या अंतापर्यंत मराठ्यांचा इतिहासावर ‘हिस्टरी ऑफ मराठा’ पुस्तक लिहिले. 1817 च्या खडकीच्या लढाईतही डफ सहभागी झाला होता. 1818 साली मराठी राज्य लया गेले. त्यानंतर तो सातारा घराण्यासाठी इस्ट इंडिया कंपनीचा राजकीय प्रतिनिधी बनला. त्यासाठी त्या काळी त्याला 2000 रुपये पगार आणि 1500 रुपये भत्ता मिळत होता. 1822 पर्यंत तो पॉलिटिकल एजंट राहिला. छत्रपती शाहू राजांचे ज्येष्ठ पुत्र होते प्रतापसिंह महाराज यांच्यासोबत त्याचे चांगले संबंध निर्माण झाले. प्रतापसिंह महाराज यांनी त्यासा त्यांच्याकडे असणारी वाघनखे भेट दिली. त्याने ती आपल्यासोबत इंग्लडंमध्ये नेली. त्यानंतर त्याच्या वारसांनी ती वाघनखे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये ठेवली. तेव्हापासून ती त्याच ठिकाणी होती. संग्रहालयातील नोंदीनुसार, डफ याचा नातू अड्रीयन ग्रॅट डफने ही वाघनखे हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमला भेट दिली. त्यांना सातारा संस्थानकडून देण्यात आली होती.
लंडनमधून वाघनखे महाराष्ट्रात आली कशी?
महाराष्ट्र सरकारकडून ही वाघनखे परत मिळवण्याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरु होते. त्यासाठी विविध पातळीवर वाटाघाटीही सुरु होत्या. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार मागील वर्षी प्रतिनिधी मंडळासह लंडनला गेले होते. त्यावेळी वाघनखे देण्यासंदर्भात चर्चा झाली. सुरुवातीला एका वर्षासाठी वाघनखे देण्याची तयारी लंडनमधील संग्राहलयाने दर्शवली. परंतु महाराष्ट्र सरकारने तीन वर्षांसाठी देण्याची मागणी लावून धरली. अखेर त्या मागणीला यश आले आणि 19 जुलै 2024 रोजी वाघनखे साताऱ्यात पोहचली. तीन वर्षांच्या काळात ही वाघनखे मुंबई, सातारा, कोल्हापूर, नागपूर यासह इतर ठिकाणी सर्वसामान्यांसाठी ठेवण्यात येणार आहे. या वाघनखांसोबत बुलेट प्रूफ कव्हर आहे.
विदेशातील ऐतिहासिक वस्तू कशी मिळवता येते?
भारताच्या अनेक ऐतिहासिक वस्तू विदेशात गेल्या आहेत. त्या परत मिळवण्याचे प्रयत्न भारत सरकारकडून सुरु आहेत. त्यासाठी दोन मार्ग असतात. पहिला मार्ग कायदेशीर पद्धतीने मिळवणे आहे. परंतु ही प्रक्रिया खूपच किचकट असते. त्याला अनेक वर्ष जातात. दुसरा मार्ग कूटनीती आहे. या कूटनीतीने भारताला तीन वर्षांसाठी वाघनखे मिळाली आहे. भारताचे प्रभूत्व जगभरात वाढत आहे. यामुळे कूटनीतीने चर्चा करुन ही वाघनखे मिळाली आहे. या पद्धतीने गेल्या 9 वर्षांत अनेक कलाकृती परत आल्या आहेत. विविध देशांमधून सुमारे 240 प्राचीन कलाकृती भारतात परत आणल्या गेल्या आहेत. त्यात 72 कलाकृती अशा आहेत, ज्या त्या देशात परत केल्या जातील. या कलाकृतींमध्ये नटराजाची 1100 वर्षे जुनी मूर्ती आहे. ही कलाकृती नालंदा संग्रहालयातून सुमारे सहा दशकांपूर्वी गायब झाली होती. तसेच 12व्या शतकातील बुद्धाची कांस्य मूर्तीसुद्धा आहे.