तुला तर बुटाने तुडवीन… CMO च्या धमकीनंतर डॉक्टर लहान मुलांसारखा ढसाढसा रडला; काय घडलं?
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक डॉक्टर ढसाढसा रडत आहे. भाजपचे नेते या डॉक्टरचं सांत्वन करत आहेत. आपल्याला वरिष्ठांनी बुटांनी मारण्याची धमकी दिल्याचा दावा हा डॉक्टर करत आहे. काय आहे प्रकार नेमका?
औरैया | 25 सप्टेंबर 2023 : उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औरैयातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सार्वजनिक आरोग्य केंद्रातील अधीक्षक ढसाढसा रडताना दिसत आहे. एवढ्या मोठ्या पदावर बसलेल्या डॉक्टरला ढसाढसा रडताना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल केला आहे. या डॉक्टरबाबत नेमकं काय घडलं? तो का रडू लागला? याची माहिती व्हायरल झाल्यानंतर तर लोकांना अधिकच धक्का बसला आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये हा डॉक्टर ढसाढसा रडताना दिसत आहे. तर त्याच्या बाजूला बसलेले भाजप नेते त्याचं सांत्वन करताना दिसत आहेत. औरैयाचे मुख्य आरोग्य अधिकारी (CMO) सुनील कुमार वर्मा हे फोनवरून या सार्वजनिक आरोग्य केंद्रातील अधीक्षकाला बुटाने तुडवण्याची धमकी देत आहेत. सीएओकडून आक्षेपार्ह भाषेचा वापर होत असल्यानेच हा डॉक्टर जोरजोरात रडत असून त्याचं भाजप नेते सांत्वन करताना दिसत आहेत.
लहान मुलांसारखे रडले
सार्वजनिक आरोग्य केंद्राचा हा अधीक्षक त्यांच्या सरकारी कार्यालयात बसून लहान मुलांसारखे रडत आहेत. रडता रडताच हा डॉक्टर सांत्वन करणाऱ्या भाजप नेत्यांना त्यांची वेदना सांगत आहे. त्यांना कशा पद्धतीने फोनवरून बुटाने तुडवण्याची धमकी मिळाली हे सांगताना दिसत आहे.
आरोग्य केंद्रात अस्वच्छता
दरम्यान, औरैयाचे सीएमओ सुनील कुमार वर्मा यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्यावर अधीक्षकाकडून लावण्यात आलेले आरोप खोटे आहेत. त्यात काहीच तथ्य नाही. सार्वजनिक आरोग्य केंद्राची पाहणी केली असता त्यात असंख्य त्रुटी आढळून आल्या होत्या. आरोग्य केंद्रात जवळपास तीन फूट झाडे उगवली होती. त्या ठिकाणी कचरा होता. दुर्गंधी येत होती. तसेच या ठिकाणी अनेक वर्ष जुने बॅनर्सही लावलेले होते. स्वच्छतेचा लवलेशही नव्हता, असा दावा सुनील कुमार वर्मा यांनी केला आहे.
धमकी दिलीच नाही
आरोग्य केंद्रातील अस्वच्छता पाहून त्यांना खडसावलं होतं. परिस्थिती सुधारा, कार्यशैली बदला, अशा सख्त सूचना अधीक्षकांना दिल्या होत्या. ही सख्त ताकीद देत असताना त्यांना कोणत्याही प्रकारचे अपशब्द वापरले नाही. बुटाने मारण्याची भाषाही केली नाही. माझ्याबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. हे चुकीचं आहे. हा व्हिडीओ बाहेर आल्यानंतर जिल्ह्यातील लोक आरोग्य व्यवस्थेच्याबाबत उलटसुलट चर्चा करत आहेत, असंही वर्मा यांनी सांगितलं.