G20 च्या आधी PM मोदी यांच्या पोस्टरवरुन काँग्रेस आणि भाजप आमने-सामने
विजय गोयल यांनी पवन खेडा यांच्यावर फेक न्यूजचा आरोप केला, त्यानंतर त्यांनी त्यांचे ट्विट डिलीट केले. भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही हे होर्डिंग नवीन नसल्याचे सांगितले.
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत 9 आणि 10 सप्टेंबर रोजी G20 शिखर परिषद होणार असून, त्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. पण या दरम्यान भाजप आणि काँग्रेस एका पोस्टरवरून आमने-सामने आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते पवन खेडा यांनी X (पूर्वी ट्विटर) वर एक फोटो शेअर करत आरोप केला आहे की, लोकप्रियता क्रमवारीच्या आधारे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर जागतिक नेत्यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत.
भाजपने पवन खेडा यांच्या पोस्टवर प्रत्युत्तर देत काँग्रेस फेक न्यूज पसरवत असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी विजय गोयल यांनीही ट्विट केले की, असे कोणतेही होर्डिंग लावलेले नाही, ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. भारत जगाचे यजमानपद भूषवणार असताना काँग्रेसने असे फुटकळ राजकारण करू नये, असेही ते म्हणाले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आपल्या पोस्टमध्ये पवन खेडा यांनी पोस्टरसह विजय गोयल यांच्यावर टीका केली आणि विचारले की आम्ही आमच्या पाहुण्यांचे असे स्वागत करतो का? या पोस्टरमध्ये जगातील सर्वात लोकप्रिय नेता म्हणून पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करण्यात आले आहे. यासोबतच या पोस्टरमध्ये पीएम मोदींशिवाय अनेक देशांच्या नेत्यांचा फोटोही दिसत आहे.
पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते
अमेरिकेतील रिसर्च फर्म ग्लोबल लीडर अप्रूवल ट्रॅकर ‘मॉर्निंग कन्सल्ट’ने आपल्या अहवालात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते असल्याचे म्हटले होते. या रिसर्च फर्मने 22 नेत्यांवर सर्वेक्षण केले होते, ज्यामध्ये पीएम मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत.
अमित मालवीय यांची काँग्रेसवर टीका
विजय गोयल यांनी पवन खेडा यांच्यावर फेक न्यूजचा आरोप केला, त्यानंतर त्यांनी त्यांचे ट्विट डिलीट केले. भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही हे होर्डिंग नवीन नसल्याचे सांगितले. हे चित्र जुने असून काँग्रेसला असे राजकारण करताना लाज वाटली पाहिजे, असे ते म्हणाले.