महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल विरोधकांना गोंधळात टाकणारा ‘तो’ प्रश्न, मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिलं ‘असं’ उत्तर
देशभरातील एकूण 26 विरोधी पक्षांची आज बैठक पार पडली. या बैठकीत विरोधी पक्षांना महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.
बंगळुरु | 18 जुलै 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेना पक्षाचा एक गट सत्तेत आहे तर दुसरा गट विरोधात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट सत्तेत आहे तर दुसरा गट विरोधात आहेत. केवळ काँग्रेस हा एकमेव विरोधी पक्ष महाराष्ट्रात सध्या तरी एकसंघ आहे. काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस अधूनमधून समोर येते. पण पक्षात फूट पडलेली नाही. याशिवाय काँग्रेसचं दिल्लीतील हायकमांडदेखील महाराष्ट्र काँग्रेसकडे लक्ष देवून आहे. असं असताना देशभरातील विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पराभवासाठी देशभरातील विरोधी पक्ष एकवटत आहेत.
विरोधी पक्षांची आज कर्नाटकातील बंगळुरु येथे आज दुसरी बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांकडून महाराष्ट्रातील गोंधळलेल्या राजकीय परिस्थितीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, विरोधी पक्षांची याआधी पाटणा येथे बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर आज कर्नाटकच्या बंगळुरु येथे बैठक आयोजित करण्यात आली. त्याआधी काँग्रेसकडून काल बंगळुरुतील एका हॉटेलमध्ये सर्व विरोधी पक्षांसाठी डिनरचं आयोजन करण्यात आलं होतं.
या दरम्यान विरोधी पक्षांची एक बैठक कालच पार पडली. त्यानंतर आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची चर्चा होती. पण शरद पवार या बैठकीला हजर नव्हते. पण उद्धव ठाकरे या बैठकीसाठी हजर होते.
शरद पवार-अजित पवार भेट, काँग्रेसचा आक्षेप
विशेष म्हणजे शरद पवार विरोधी पक्षांच्या कालच्या बैठकीला उपस्थित नव्हते. ते काल मुंबईत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री आणि 30 आमदारांनी काल शरद पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे राष्ट्रादीच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या मनातही याविषयी संभ्रम निर्माण झालाय. तसेच काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्या यशोमती ठाकूर यांनी पवार काका-पुतण्याच्या भेटीवर आक्षेप घेतलाय. शरद पवार यांनी अजित पवार यांची वारंवार भेट घेणं हे कुणालाही आवडलेलं नाही, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत.
विरोधकांच्या पत्रकार परिषदेत महत्त्वाचा प्रश्न
या सगळ्या घडामोडींशी संबंधित प्रश्न आज विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. विरोधी पक्षांच्या आजच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पत्रकारांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत सहभागी आहे. मग त्यांना कसं विरोधकांच्या आघाडीत सामावून घेतलं जातंय? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रतिक्रिया दिली.
‘पक्ष निर्माते इथे बसले आहेत’
“शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. ते पक्षाचे नेता आहे. लोकप्रिय आहेत. त्यांना कार्यकर्ते आणि नागरिकांचा पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे हे सुद्धा लोकप्रिय नेते आहेत.लोकं त्यांच्यासोबत आहेत. आमदार येतील किंवा जातील ते महत्त्वाचं नाही. पक्ष निर्माते इथे आहेत. दोघं पक्ष निर्माते आहेत. ते फायटर आहेत. त्यामुळे तु्म्ही काळजी करु नका. आम्ही एक आहोत. आमच्यात डिवीजन होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही”, असं उत्तर मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिलं.