ज्यांचे नवरे म्हातारे असतात त्या बायका… काँग्रेसचा आमदार बरळला; वाद होताच…
काँग्रेसचे आमदार केपी सिंह हे सध्या एका वादग्रस्त विधानामुळे भलतेच अडचणीत आले आहेत. त्यांच्या वादग्रस्त विधानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.
शिवपुरी | 10 सप्टेंबर 2023 : मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील पिछोर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार केपी सिंह यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांच्या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. केपी सिंह यांनी आमदार महिला आणि बुजुर्गांबाबत धक्कादायक विधान केलं आहे. हा व्हिडीओ पिछोर येथील एका जाहीर सभेतील असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओतील आक्षेपहार्य विधानामुळे केपी सिंह यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
केपी सिंह हे पिछोरमधून सहावेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. एवढ्या जबाबदार नेत्याने महिलांविषयी चुकीचं आणि खालच्या स्तरावरील विधान केल्याने त्यांचाावर टीका होत आहे. ज्या महिलांचे नवरे म्हातारे असतात त्या महिलांसोबत दुसरे पुरुष रात्री शय्यासोबत करत असतात. त्यांच्या नवऱ्यांकडून काहीच होत नाही. ते काहीच करू शकत नाही, असं धक्कादायक विधान केपी सिंह यांनी केलं आहे.
सुरुवातीला आनंदी असतात
म्हातारी माणसं लहान वयाच्या महिलांसोबत लग्न करत असल्याचं मी अनेकदा पाहिलं आहे. घरात नवी नवरी आल्याने ते आनंदी होतात. मात्र, नंतर त्यांच्याकडून काहीच होत नाही. त्यामुळे अशा महिलांमध्ये नंतर वेगळीच लक्षणं दिसतात, असे तारेही सिंह यांनी तोडले आहेत.
टीकेनंतर माफी
केपी सिंह यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. या टीकेनंतर केपी सिंह यांनी सारवासारव केली आहे. मी असं म्हणालोच नाही. माझ्या म्हणण्याचा अर्थ वेगळा काढला गेला आहे. माझा व्हिडीओ मॉर्फ करून फिरवला जात आहे. मी सर्वच महिलांचा आदर करतो. मात्र, तरीही महिलांच्या सन्माला ठेच लागली असले तर मी जाहीर माफी मागतो, असं सिंह म्हणाले आहेत.
भाजपची टीका
दरम्यान, केपी सिंह यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपचे प्रवक्ते शिवम शुक्ला यांनी ट्विट करून टीका केली आहे. पिछोरमधील काँग्रेसचे आमदार केपी सिंह महिलांबाबत अपशब्द बोलत आहेत. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या भाषेचा उपयोग करून काँग्रेसने आपली मानसिकता दाखवून दिली आहे. काँग्रेसची ही मानसिकताच चुकीची आहे. महिलाविरोधी आहे, असं शिवम शुक्ला यांनी म्हटलं आहे.