काँग्रेसचं महाअधिवेशन आजपासून, पहिल्याच दिवशी सोनिया गांधी, राहुल आणि प्रियंका यांची दांडी; नव्या अध्यक्ष निवडीचं कनेक्शन?
मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतरचं हे पहिलंच अधिवेशन आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गांधी कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित राहणार नाही. त्याचा खरगे यांच्या अध्यक्षपदाशी कोणताही संबंध नाही.
रायपूर : छत्तीसगडच्या रायपूरमध्ये आजपासून काँग्रेसचं महाअधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात राजकारण, अर्थव्यवस्थेसह विविध विषयाचे ठराव मंजूर करण्यात येणार आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांची एकजूट करण्यावरही या अधिवेशनात भर देण्यात येणार आहे. तसेच या संदर्भात काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. काँग्रेसचं हे 85 वे महाअधिवेशन 24 ते 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. मात्र, पहिल्याच दिवशी गांधी कुटुंबातील एकही सदस्य या अधिवेशनात दिसणार नाही. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे पहिल्याच दिवशी दांडी मारणार आहेत. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
आज सकाळी 10 वाजल्यापासून काँग्रेस संचालन समितीची बैठक होईल. या बैठकीत मसुदा समितीने तयार केलेल्या प्रस्तावावर एक एक करून विचार केला जाईल. त्यावर अनुमोदन केलं जाईल. तसेच विषय संबंधि समितीही त्यावर बैठक करेल. या बैठकीत अनेक प्रस्तावांना मंजुरी दिली जाईल, असं काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितलं. संचालन समिती आजच्या अधिवेशनात सविस्तर अजेंडा मांडेल. तसेच त्याचा स्विकारही करेल. भारत जोडो यात्रेला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे हाथ से हाथ जोडो ही टॅग लाईन या अधिवेशनात ठेवण्यात आली आहे.
2024च्या लोकसभा निवडणुकांवर चर्चा
लोकसभा निवडणुकीला एक वर्ष बाकी आहे. त्यामुळे विरोधकांच्या एकजूटीवर सध्या जोरदार चर्चा होत आहे. त्यामुळे या महाअधिवेशनात लोकसभा निवडणुकीची रणनीती आणि विरोधकांच्या एकजूटीवर चर्चा होणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी 21 फेब्रुवारी रोजी नागलँडमध्ये मोठं विधान केलं होतं. काँग्रेस पुढील वर्षी केंद्रात आघाडी सरकार स्थापन करेल, असं मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी काँग्रेस सामूहिक सरकार बनवेल असं म्हणाले होते.
एवढे सदस्य सहभागी होणार
काँग्रेसच्या या महाअधिवेशनात देशभरातून नेते येणार आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीतील सामान्य श्रेणीतील 704, अल्पसंख्याक समुदायातील 228, ओबीसी समुदायातील 381, अनुसूचित जातीतील 192, अनुसूचित जमातीतील 133, महिला 235 आणि 50 वर्षाचे कमीत कमी 501 सदस्य या अधिवेशनात सहभागी होणार आहेत.
चर्चांना उधाण
मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतरचं हे पहिलंच अधिवेशन आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गांधी कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित राहणार नाही. त्याचा खरगे यांच्या अध्यक्षपदाशी कोणताही संबंध नाही. मात्र, गांधी कुटुंबातील सदस्य पहिल्या दिवशी गैरहजर का राहणार आहेत, याची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. यापूर्वी 2018मध्ये काँग्रेसचं महाअधिवेशन दिल्लीत झालं होतं.