लज्जास्पद ! सामूहिक विवाहात मेकअप किटमधून कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांचं वाटप; कुठे घडला हा धक्कादायक प्रकार?
मध्यप्रदेशात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सामूदायिक विवाह सोहळ्यात चक्क कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांचं वाटप करण्यात आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
झाबुआ : मध्यप्रदेशातील झाबुआ येथे अत्यंत धक्कादायक आणि लज्जास्पद प्रकार घडला आहे. मुख्यमंत्री कन्यादान योजने अंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्या दरम्यान कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांचं वाटप करण्यात आलं. मेकअप किटमधून हे वाटप करण्यात आलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. थांदलाच्या दसरा मैदानावर सोमवारी 296 जोडपे विवाह बंधनात अडकले. त्यावेळी हा प्रकार घडला. या प्रकारामुळे वऱ्हाडींना तर धक्काच बसला असून प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
विवाह सोहळ्यावेळी अधिकाऱ्यांनी नववधूंना मेकअपच्या किट्स दिल्या. या किट्समध्ये गर्भनिरोधक गोळ्या होत्या. तसेच कंडोमचे पाकिटही होते. विशेष म्हणजे या एवढ्या मोठ्या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित राहू शकले नाहीत. पण त्यांनी ऑनलाईन संवाद साधत नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिला.
सर्वांचेच हातवर
मध्यप्रदेशात अनेक सामूदायिक विवाह सोहळे झाले. पण पहिल्यांदाच एखाद्या सामूहिक विवाह सोहळ्यात मेकअप किटमधून कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांचं वाटप करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या मेकअप किट्समध्ये कंडोम आणि गर्भनिरोधक गोळया कुणी ठेवल्या याची थांगपत्ता लागलेला नाही. कुणीही याची जबाबदारी घेतलेली नाही. सर्वांनीच हातवर केले. काही अधिकाऱ्यांना याबाबत विचारण्यात आले असता त्यांनी हा कारनामा आरोग्य विभागाने केल्याचं सांगितलं. पण आरोग्य विभागाने त्यावर अजून भाष्य केलेलं नाही.
लग्नाआधी प्रेग्नंसी टेस्ट
सामूदायिक विवाह सोहळ्यातील ही पहिली चूक नाही. यापूर्वीही अशा अनेक चुका झाल्या आहेत. यापूर्वी सामूदायिक विवाह सोहळ्यावेळी प्रेग्नंसी टेस्ट करण्यात आली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्याबाबत संतापही व्यक्त केला गेला होता. एप्रिलमध्येच डिंडोरी येथे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात लग्नापूर्वी 219 वधूंची प्रेग्नंसी टेस्ट करण्यात आली होती. त्यामुळे सरकारवर प्रचंड टीका झाली होती.