COVID-19: महाराष्ट्रासह देशात कोरोना वाढवतोय चिंता, 24 तासात इतक्या रुग्णांची वाढ
देशात कोरोना रुग्णांची दररोज वाढत असलेली संख्या प्रशासनाच्या चिंता वाढवत आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट अधिक रुग्णांमध्ये आढळला आहे.
मुंबई : भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये ( Corona cases ) वाढ होत आहे. ही वाढ मोठी नसली तरी देखील चिंता वाढवणारी आहे. कारण दररोज सातत्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आता गेल्या 24 तासात कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये सुमारे 38 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मंगळवारी सात हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले होते. तिथे आज 10 हजार 542 प्रकरणे समोर आली आहेत. सक्रिय रुग्णांची संख्याही सातत्याने वाढत आहे. बुधवारी सकाळपर्यंत देशात 63 हजार 562 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, कोरोनाच्या संसर्गामुळे 38 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात कोरोना बाधित झालेल्यांची एकूण संख्या 4,48,45,401 झाली आहे. तर मृतांचा आकडा 5 लाख 31 हजार 190 वर पोहोचला आहे. केरळमध्ये सर्वाधिक 11 लोकांचा मृत्यू झाला आहे.
सध्या देशात दैनंदिन संसर्गाचे प्रमाण 4.47 टक्के नोंदवले गेले आहे. त्याच वेळी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.67 टक्के आहे. कोरोनामधून बरे होणाऱ्या लोकांची संख्या 4,42,50,649 झाली आहे, तर मृत्यूदर 1.18 टक्के नोंदवला गेला आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत कोविड लसीचे 220.66 कोटी डोस देण्यात आले आहेत. २ डोस घेतल्यानंतर आता सरकारकडून बुस्टर डोस घेण्याचं आवाहन देखील केलं जात आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये होत असलेली वाढ ही नव्या व्हेरिएंटमुळे आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट अधिक रुग्णांमध्ये आढळून आला आहे.
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाचे 949 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर सहा रुग्णांचा मृत्यू झालाय. 912 रुग्ण बरेही झाले आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 6118 वर पोहोचली आहे. एक दिवसापूर्वी राज्यात कोरोनाचे 505 रुग्ण आढळले होते. 12 एप्रिलपासून राज्यात कोरोनाचे 6117 रुग्ण आढळले आहेत. गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याचं आवाहन केलं जात आहे.
दिल्ली, पश्चिम बंगाल, कर्नाटक या राज्यांमध्ये ही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अनेक ठिकाणी राज्य सरकार सतर्क आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.