Delhi Weather: दिल्लीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, वृक्ष उन्मळून पडले; विमानसेवा विस्कळीत
Delhi Weather: दिल्लीकरांना अखेर उकाड्यातून सुटका मिळाली आहे. सकाळपासूनच दिल्लीत वेगाने वारे वाहत असून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.
नवी दिल्ली: देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्ली आणि एनसीआर परिसरात आज पहाटे पहाटे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वादळीवाऱ्यासह (Heavy Wind) झालेल्या पावसाने या परिसराला अक्षरश: झोडपून काढले. या वादळीवाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत. भररस्त्यावर ही झाडे पडल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे. तर खराब हवामानामुळे दिल्लीतील विमान सेवा (Delhi Airport) विस्कळीत झाली आहे. विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विमानतळाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, आज सकाळी सकाळी झालेल्या पावसामुळे दिल्लीकरांची उकाड्यातून (Heat Wave) सुटका झाली आहे. दिल्लीत गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान, येत्या 24 तासात दिल्ली-एनसीआर (Delhi-NCR) आणि उत्तर प्रदेशासहीत अनेक राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज रविवारीच हवामान खात्याने वर्तवला होता. त्यामुळे आज दिवसभर दिल्लीत पाऊस राहील असं सांगितलं जात आहे.
#WATCH | Strong winds and rain lash parts of National Capital. Early morning visuals from Janpath. pic.twitter.com/8shwyQVGBq
— ANI (@ANI) May 23, 2022
दिल्लीला वादळीवाऱ्याचा फटका
दिल्लीकरांना अखेर उकाड्यातून सुटका मिळाली आहे. सकाळपासूनच दिल्लीत वेगाने वारे वाहत असून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. काही ठिकाणी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत. हवामान खात्याच्या माहितीनुसार दिल्लीतील तापमान 39 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे. तर कमाल तापमान 23 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुढील दोन दिवस दिल्लीत काहीसं ढगाळ वातावरण राहील आणि पाऊस पडेल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.
विमानसेवा विस्कळीत
पहाटेपासून वादळीवाऱ्यासह पाऊस कोसळल्याने त्याचा फटका दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळालाही बसला. अंधार, वादळीवारे आणि खराब हवामान यामुळे विमानसेवा विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी घराच्याबाहेर पडताना विमानतळ प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ताशी 60 ते 90 किलोमीटर वेगाने वारे
दरम्यान आज दिल्लीत ताशी 60 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. पुढील दोन तास वाऱ्याचा हा वेग कायम राहणार असल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे.
उद्याचा दिवस पावसाचा
हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्याही दिल्ली आणि आसपासच्या परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्लीला आज दिवसभर मान्सून पूर्व पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार आज सकाळी सकाळीच दिल्लीत वरुणराजाने हजेरी लावली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्याही हीच परिस्थिती राहील. त्यामुळे दिल्ली आणि आसपासच्या परिसरातील तापमान कमी होण्याची शक्यता आहे.
या आठवड्यात उकाड्यातून सुटका
या आठवड्यात दिल्लीतील तापमान कमी होणार आहे. पावसामुळे तापमान कमी होणार असल्याने दिल्लीकरांची या संपूर्ण आठवड्यात उकाड्यापासून सुटका होणार असल्याचं सांगितलं जात आहे. दिल्लीत 25 मे रोजी कमाल तापमान 37 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 26 डिग्री सेल्सिअस राहणार आहे. 26 मे रोजी कमाल तापमान 38 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 27 डिग्री सेल्सिअस राहणार आहे. 27 मे रोजी कमाल तापमान 40.0 डिग्री सेल्सियस आणि किमान तापमान 27.0 डिग्री सेल्सियस राहण्याचा अंदाज आहे. या काळात दिल्लीत चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. 28 मे रोजी कमाल तापमान 41.0 डिग्री सेल्सियस, तर किमान तापमान 28.0 डिग्री सेल्सियस राहील. 29 मे रोजी तापमानात किंचित वाढ होऊन 42.0 डिग्री आणि कमाल तापमान 29.0 डिग्री सेल्सियस राहील.