मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग?
don dawood ibrahim | मोस्ट वॉण्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. दाऊदवर कराचीमध्ये विषप्रयोग करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. परंतु यासंदर्भात भारतीय किंवा पाकिस्तानी माध्यमांकडून दुजोरा मिळाला नाही. परंतु दाऊद दाखल असलेल्या रुग्णालयात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
नवी दिल्ली, दि.18 डिसेंबर | मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी आणि मोस्ट वॉण्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. दाऊद याच्यावर कराचीमध्ये विषप्रयोग करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. दरम्यान, मुंबई पोलीस दाऊद इब्राहिमच्या जवळच्या नातेवाईकांकडून याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी
1993 मधील मुंबई बॉम्बस्फोटचा आरोपी असलेला दाऊद अनेक वर्षांपासून कराचीमध्ये राहत आहे. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात तो मुख्य आरोपी आहे. 1993 मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटात 250 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच हजारो जण जखमी झाले होते. दाऊद इब्राहिम विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. परंतु पाकिस्तान दाऊद याचा ताबा भारताकडे देण्यास तयार नव्हता. आता त्याच्यावर अज्ञात व्यक्तीने विषप्रयोग केल्याची माहिती सोशल मीडियातून समोर आली आहे.
दाऊद टोळीचा सदस्य म्हणतो…
दाऊद याच्या टोळीतील एका माजी सदस्याने त्याच्या आजाराबाबत माहिती दिली आहे. दाऊद गंभीर आजारामुळे रुग्णालयात असल्याचे त्याने म्हटले आहे. दाऊद याला दोन दिवसांपूर्वी कराचीमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला गेला आहे. दाऊद दाखल असलेल्या मजल्यावर कोणालाही प्रवेश दिला जात नाही. पाकिस्तान सरकारमधील उच्चपदस्थ अधिकारी आणि कुटुंबातील जवळच्या सदस्यांना भेटण्याची परवानगी आहे.
पाकिस्तान माध्यमात काय आहे दावा
जिओ टीव्ही न्यूजनेही म्हटले आहे की, सोशल मीडियावर दाऊद इब्राहिम याच्यावर विषप्रयोग झाल्याचा दावा केला जात आहे. परंतु त्याला गंभीर आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दाऊद कराची येथील रुग्णालयात दाखल आहे. काही रिपोर्टमध्ये त्याच्यावर विषप्रयोग झाल्याचे म्हटले जात आहे. परंतु दाऊद याला रुग्णालयात का दाखल करण्यात आले आहे, त्याचे कारण स्पष्ट झाले नाही. कारण पाकिस्तानी किंवा भारतीय अधिकाऱ्यांनी यासंदर्भात दुजोरा दिलेला नाही. दाऊद याला अनेक गंभीर आजार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती.