कोरोनाला हलक्यात घेऊ नका, कोविड JN.1 ची नवीन लक्षणे आली समोर
COVID 19 : जगभरात झपाट्याने वाढणारा कोरोनाचा नवा व्हेरिएंट भारतात देखील आढळून आला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट दाखल झाला आहे. या कोरोनाच्या नव्या वेरिएंटचीे अनेक लक्षणं समोर आली होती. पण यात आणखी काही गोष्टींची भर पडली आहे. कोणती आहेत ती लक्षणे जाणून घ्या.
Covid-19 Update : कोरोनाच्या नवीन प्रकाराने पुन्हा एकदा जगाच्या चिंता वाढवल्या आहेत. कारण अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. अमेरिका आणि मलेशियामध्ये आढळलेला व्हेरिएंट भारतात देखील दाखल झाला आहे. महाराष्ट्रात देखील याचे रुग्ण आढळून आले आहेत. नव्या कोरोनाच्या व्हेरिएंटची वेगवेगळी लक्षणे आता समोर येऊ लागली आहेत. ज्यामध्ये ताप, खोकला, नाक वाहणे, घसा खवखवणे, अंगदुखी आणि थकवा ही सामान्य लक्षणे दिसून आली आहेत. ज्यामध्ये धाप लागणे हे धोक्याचे लक्षण आहे. वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना गंभीर आजारांचा धोका वाढतो.
काय आहेत कोरोनाची नवीन लक्षणे
कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट संसर्गजन्य आहे. जो झपाट्याने संसर्ग वाढवतो आहे. रोगप्रतिकारशक्ती पासून बचाव करण्यासाठी तो सक्षम आहे. JN.1 या नव्या व्हेरिएंटमुळे ताप, थकवा आणि अंगदुखी सारख्या समस्या जाणवत आहेत. काही लोकांना मध्यम गॅस्ट्रोइंटेस्टाइनल लक्षणे देखील जाणवली आहेत आणखी दोन नवीन लक्षणे म्हणजे चिंता वाढणे आणि झोप न लागणे.
कोविडची लक्षणे आधीसारखीच आहेत. ताप किंवा थंडी वाजून येणे, खोकला, धाप लागणे, थकवा, स्नायू दुखणे, डोकेदुखी, चव आणि वास कमी होणे, घसा खवखवणे, नाक बंद होणे, नाक वाहणे, मळमळ आणि अतिसार ही सर्व लक्षणे देखील दिसून आली आहेत. कोविड-19 साथीचा रोग तणाव, चिंता आणि झोप न लागणे या समस्या नव्याने आढळून आल्या आहेत.
चिंता आणि निद्रानाश
कोरोनाचा हा व्हेरिएंट अजून तरी नियंत्रणात आहे. यावर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे. चिंता आणि बदलत्या जीवनशैलीमुळे आधीच लोकांना झोपेचा त्रास आहे. त्यात कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटमुळे देखील त्यात भर पडू शकते. कोरोनाच्या या व्हेरिएंटमुळे श्वसन समस्या, वेदना किंवा ताप येऊ शकतो. रोगप्रतिकारक शक्ती चांगली हवी असेल तर त्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक असते. त्यामुळे या काळात चांगली झोप घेणे महत्त्वाचे आहे.