हालचाली वाढल्या, प्रचंड मोठ्या घडामोडी, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता
झारखंडच्या राजकारणात मोठा भूकंप येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. त्यामुळे हालचालींना वेग आला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री निवासस्थानी प्रचंड मोठ्या घडामोडी घडत आहेत.
रांची | 31 जानेवारी 2024 : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची दाट शक्यता आहे. कारण तशा घडामोडी झारखंडमध्ये घडताना दिसत आहेत. ईडी अधिकाऱ्यांकडून हेमंत सोरेन यांची अनेक तासांपासून चौकशी सुरु आहे. विशेष म्हणजे हेमंत सोरेन यांची ईडी चौकशी सुरु असताना रांची येथे मुख्यमंत्री निवासस्थानी अचानक हालचालींना वेग आला. हेमंत सोरेन यांच्या रांची येथील मुख्यमंत्री निवासस्थान परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राज्याचे पोलीस महासंचालक आणि राज्याचे मुख्य सचिव दाखल झाले आहेत. काहीतरी मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. हेमंत सोरेन यांना कदाचित अटक देखील केली जाऊ शकते, अशी चर्चा रंगली आहे. ईडीकडून त्यांची कथित जमीन घोटाळा प्रकरणी गेल्या अनेक तासांपासून चौकशी सुरु आहे.
ईडीकडून हेमंत सोरेने यांची जमीन घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरु आहे. ईडी अधिकारी दुसऱ्यांदा हेमंत सोरेन यांची चौकशी करत आहे. याआधी सोरेन यांची 20 जानेवारीला चौकशी झाली आहे. झारखंडमध्ये एकीकडे ईडीकडून मुख्यमंत्र्यांची चौकशी सुरु आहे तर दुसरीकडे झारखंड मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून ईडीच्या कारवाईविरोधात आंदोलन सुरु आहे. हेमंत सोरेन मंगळवारी 40 तासांनंतर दिल्लीहून रांची येथे दाखल झाले होते. ते दिल्ली येथून रस्ते मार्गाने रांचीला पोहोचले होते. जवळपास 1250 किमी रस्ते मार्गाचा प्रवास करुन ते रांचीला पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चाच्या ज्येष्ठ नेते आणि आमदारांसोबत चर्चा केली होती.
या बैठकीला मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पनी सोरेन यादेखील उपस्थित होत्या. या बैठकीत आमदारांनी एकजुटता दाखवत समर्थन पत्रावर स्वाक्षरी केली होती. विशेष म्हणजे हेमंत सोरेन यांना अटक केल्यानंतर कदाचिक कल्पना सोरेन यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली जाईल, अशी चर्चा होती. पण आता वेगळी माहिती समोर आली आहे.
आमदारांना दुसरीकडे हलवलं जाणार?
दुसरीकडे हेमंत सोरेन सरकार आपल्या आमदारांना दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी शिफ्ट करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. झारखंडच्या मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर दोन टुरिस्ट बस पोहोचल्या आहेत. याच दोन बसेसमधून आमदारांना दुसरीकडे शिफ्ट केलं जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री निवासस्थानाच्या मागच्या दरवाज्यातून दोन बसगाड्या बोलवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे असंही सांगितलं जात आहे की, आमदार आपले कपडे घेऊन आलेले नाहीत. त्यांचे पीए कपडे घेऊन येणार आहेत.
चंपई सोरेन यांच्या हाती झारखंडची सत्ता दिली जाणार?
विशेष म्हणजे या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची चर्चा समोर येत आहे. सर्व मंत्री आणि आमदारांना टुरिस्ट बसमध्ये बसवून राजभवन नेलं जाण्याची शक्यता आहे. मंत्री चंपई सोरेन यांच्या हाती झारखंडची सत्ता दिली जाण्याची शक्यता आहे. चंपई सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाचे सर्वेसर्वा शिबू सोरेन यांचे जवळचे मानले जातात. चंपई हे सरायकेला विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि सध्या राज्याचे परिवहन मंत्री आहेत.