Farooq Abdullah: काश्मिरी पंडितांना वाचवायचं असेल तर ‘काश्मीर फाईल्स’वर बंदी घाला; फारूख अब्दुल्लांची मागणी
Farooq Abdullah: काश्मीर फाईल्स हा सिनेमा वास्तवावर आधारीत नाही. केवळ देशात द्वेष निर्माण करण्याचं काम या सिनेमातून करण्यात आलं आहे.
श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) काश्मीर पंडितांवर होत असलेल्या हल्ल्यावर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला (farooq abdullah) यांनी मोठं विधान केलं आहे. अब्दुल्ला यांनी हा हल्ल्याचा संबंध थेट द काश्मीर फाईल्स (the kashmir files) या सिनेमाशी सोडला आहे. काश्मिरी पंडितांवरली हल्ले रोखायचे असतील तर सरकारने काश्मीर फाईल्स या सिनेमावर बंदी घालावी, अशी मागणी अब्दुल्ला यांनी केली आहे. देशातील मुस्लिमांच्या विरोधात द्वेषाचं वातावरण आहे. काश्मिरी मुस्लिम तरुणांमध्ये त्याचीच चीड आहे. त्यामुळेच हे हल्ले होत आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला आहे. द काश्मीर फाईल्स हा सिनेमा खरोखरच वास्तवावर आधारीत आहे का? असा माझा सरकारला सवाल आहे. एक मुस्लिम आधी एका हिंदूला ठार मारेल. त्यानंतर त्याच्या रक्ताने माखलेले तांदूळ त्याच्या पत्नीला खायला देईल, असं कधी होऊ शकतं का? आम्ही एवढ्या खालच्या पातळीवर गेलोय का? असा संतप्त सवालही त्यांनी केला.
काश्मीर फाईल्स हा सिनेमा वास्तवावर आधारीत नाही. केवळ देशात द्वेष निर्माण करण्याचं काम या सिनेमातून करण्यात आलं आहे, असं त्यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून अचानक काश्मिरी पंडितांवरील हल्ले वाढले आहे. त्यामुळे नायब राज्यपालांनी काश्मीर खोऱ्यातील काश्मिरी पंडितांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले आहेत.
लश्कर ए इस्लामची धमकी
काश्मिरी पंडितांवर हल्ले होत असतानाच लश्कर ए इस्लामने रविवारी धमकी दिली आहे. काश्मिरी पंडितांनी काश्मीर खोरं सोडावं किंवा मरायला तयार राहावं, अशी धमकी या संघटनेने दिली आहे. सर्व प्रवाशी आणि संघाच्या एजंटांनी काश्मीर सडावं. नाही तर मृत्यूला सामोरे जावं. काश्मिरी पंडितांना इथे जागा नाही. तुमची सुरक्षा डबल ट्रिपल करा, पण टार्गेट किलिंगसाठी तुम्ही तयार राहा. तुम्ही मरणार आहात, असं या संघटनेने म्हटलं आहे.
पुलवामामधील हवाल ट्रान्झिट निवासस्थानी राहत असलेल्या काश्मिरी पंडितांना ही धमकी दिली गेली आहे. ट्रान्झिस्ट येथे राहणारे सर्वाधिक काश्मिरी पंडित हे सरकारी नोकरी करत आहेत. या ठिकाणीच लश्कर ए इस्लामने पोस्टर लावले आहेत.
हल्ले वाढले
काश्मीरमधील 370 कलम हटवण्यात आल्यानंतर काश्मिरी पंडितांच्या घरवापसीचे दावे करण्यात आले होते. मात्र, मागच्या तीन वर्षांपासून काश्मिरी पंडित ज्या ठिकाणी राहत आहेत, तिथे त्यांना राहण्यास मज्जाव केला जात आहे. त्यांची हत्या केली जात आहे. गेल्या आठवड्यात राहुल भट्ट यांची हत्या करण्यात आली होती.