पंजाबचे मुख्यमंत्री अडचणीत, काय आहे प्रकरण?
मुख्यमंत्री भगवंत मान सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यांमुळे अडचणीत चर्चेत आले आहेत. मान यांची पहिली पत्नी प्रीत ग्रेवाल यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे मान यांना धमकी दिली आहे. तर, त्यांची मुलगी सीरत कौर हिनेही आपल्या वडिलांवर गंभीर आरोप केले आहेत.
पंजाब | 10 डिसेंबर 2023 : आपचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यांमुळे अडचणीत आले आहेत. त्यांची पहिली पत्नी इंदरप्रीत कौर यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी भगवंत मान यांना तो व्हिडिओ पोस्ट करण्याची धमकी दिली आहे. दुसरीकडे मान यांची मुलगी सीरत कौर हिनेही आपल्या वडिलांवर आरोप केले आहेत. सीरत कौर यांनी सोशल मिडीयावर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. याच व्हिडिओच्या आधारे शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम सिंह मजिठिया यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर जोरदार टीका केलीय.
भगवंत मान यांची पहिली पत्नी इंदरप्रीत कौर यांनी सोशल मीडिया एक पोस्ट केली आहे. यामधून त्यांनी मुख्यमंत्री मान यांना धमकी दिली आहे. ‘लवकरच असे व्हिडिओ पोस्ट करणार आहे. त्यात मान यांचं आक्षेपार्ह वर्तन दिसत आहे, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
इंदरप्रीत कौर यांनी ही पोस्ट करण्याच्या एक दिवस आधीच त्यांची मुलगी सीरत कौर हिनेही एक व्हिडिओ पोस्ट केलाय. यात सीरत कौर हिने वडील भगवंत मान यांच्यावर आरोप केले आहेत.
भगवंत मान यांची दुसरी पत्नी डॉ गुरप्रीत कौर यांनी तिला आणि तिच्या भावंडाला बाजूला केले. आता डॉ. गुरप्रीत कौर देखील गर्भवती आहेत. पण, यात वडिलांनी आपली जबाबदारी टाळली. वडील आणि त्यांच्यात होणारे वाद यामुळे आम्ही त्यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. असं मुलगी सीरत कौर हिने म्हटलंय.
सीरत कौर हिच्या याच व्हिडिओवरून शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम सिंह मजिठिया यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर निशाणा साधलाय. सीरत कौर हिने वडिलांच्या ‘एकनिष्ठतेला’ आव्हान दिले आहे. जे स्वतःच्या मुलांना नापास करतात त्यांच्यावर राज्याच्या हिताची प्रभावीपणे सेवा करण्यासाठी अवलंबून राहू शकत नाही, अशी टीका मजिठिया यांनी केलीय.