मोठी बातमी! श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अफताब पुनावाला याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी एक मोठी बातमी समोर आलीय. श्रद्धाची निर्घृणपणे हत्या करणारा आरोपी अफताब पुनावाला याच्यावर हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.
नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी एक मोठी बातमी समोर आलीय. श्रद्धाची निर्घृणपणे हत्या करणारा आरोपी अफताब पुनावाला याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. हल्लेखोरांकडे तलवारी होत्या. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मारेकरी हे हिंदुत्ववादी संघटनेते कार्यकर्ते आहेत. दरम्यान, पोलिसांनी हवेत फायरिंग केल्याने हल्लेखोर दूर पळाले. नंतर अफताबला घेऊन पोलिसांची गाडी जेलकडे रवाना झाली. पण हल्ला करणाऱ्यांनी पोलीस व्हॅनवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी अफताब पुनावाला याची आज पॉलिग्राफ टेस्ट करण्यात आली. त्यानंतर त्याला लॅबमधून जेलमध्ये नेलं जात होतं. या दरम्यान चार-पाच जणांनी हातात तलवार घेऊन अफताबवर हल्ल्याचा प्रयत्न केला. हल्ल्याचा प्रयत्न करणारे हिंदू सेनेचे कार्यकर्ते होते, अशी माहिती समोर येतेय.
यावेळी हल्लेखोरांनी अफताब ज्या पोलीस व्हॅनमध्ये होता त्या व्हॅनवर तलवारीने हल्ला केला. पोलिसांनी यावेळी त्यांना दूर सारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण हल्लेखोर ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते.
पोलिसांनी हल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांकडून तलवारी जप्त केल्या. संबंधित घटना कॅमेऱ्यात कैद झालीय.
या दरम्यान प्रसारमाध्यमाच्या काही प्रतिनिधींनी हल्ला करणाऱ्या हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी अफताबवर असलेला संताप व्यक्त केला.
“आमच्या माता-बहिणींवर अत्याचार करत आहेत. मग त्याला अशाप्रकारे का मारु नये?”, असा प्रतिप्रश्न एका कार्यकर्त्याने पत्रकारांना विचारला.
“आम्ही बंदूक आणि तलवार घेऊन येऊ. आम्ही जेलमध्ये जाऊ, आमच्या कोणत्याही बहिणीवर अत्याचार केला तर आम्ही त्याला मारु”, अशी प्रतिक्रिया एका कार्यकर्त्याने दिली.