मोदींची सत्ता आल्यापासून किती खासदार आणि आमदार काँग्रेसला सोडून गेले; कपिल सिब्बल यांनी सांगितला नेमका आकडा
उत्तर प्रदेशसह पाच राज्यात मोठा पराभव झाल्यानंतर काँग्रेस खडबडून जागी झाली आहे. या पराभवाची समीक्षा करण्यासाठी आणि भविष्यात काँग्रेसला मजबूतपणे उभे करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसमध्ये जोर बैठका सुरू आहेत.
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशसह (uttar pradesh) पाच राज्यात मोठा पराभव झाल्यानंतर काँग्रेस (congress) खडबडून जागी झाली आहे. या पराभवाची समीक्षा करण्यासाठी आणि भविष्यात काँग्रेसला मजबूतपणे उभे करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसमध्ये जोर बैठका सुरू आहेत. तर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल (kapil sibal) यांनी तर थेट काँग्रेस नेतृत्वावरच हल्लाबोल केला आहे. गांधी कुटुंबाने आता पक्षाची धुरा इतरांकडे द्यावी, अशी सूचना सिब्बल यांनी केली आहे. तसेच केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 2014मध्ये सरकार आलं. तेव्हापासून ते आतापर्यंत 177 खासदार आणि आमदारांसह एकूण 222 उमेदवार काँग्रेसला सोडून गेल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केला आहे. एखाद्या राजकीय पक्षातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर नेते सोडून गेल्याची ही पहिलीच वेळ आहे. इतिहासात यापूर्वी असं कधी घडलं नव्हतं, असं सांगत सिब्बल यांनी पक्षाला एकप्रकारे आरसा दाखवण्याचाच प्रयत्न केला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत ही आकडेवारी सादर केली आहे. 2014 पासून काँग्रेसच्या कामगिरीत सातत्याने घसरण होत आहे. प्रत्येक निवडणुकीत आम्ही एक एक राज्य गमावत आहोत. ज्या ठिकाणी आम्ही यशस्वी ठरलो, त्या राज्यात कार्यकर्त्यांना सांभाळू शकलो नाही. अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी पक्षांतर केलं आहे, असं सांगतानाच पाच राज्यातील निवडणूक निकालामुळे मला जराही आश्चर्य वाटलं नाही. मला या निकालाचा अंदाजा होताच, असं सिब्बल यांनी म्हटलं आहे. आता कुटुंबाची काँग्रेस ऐवजी सर्वांचीच काँग्रेस झाली पाहिजे, असं सांगत त्यांनी गांधी कुटुंबाला इतरांकडे नेतृत्व देण्याची सूचनाही केली आहे.
जमानत जप्त होण्यात काँग्रेस नंबर वन
यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशातील पक्षाच्या कामगिरीवरही बोट ठेवलं आहे. यावेळी उत्तर प्रदेशात अत्यंत खराब कामगिरी झाली आहे. उत्तर प्रदेशात जमानत जप्त होण्यात काँग्रेस नंबर वन ठरला आहे. 399 उमेदवारांपैकी 387 उमेदवारांची जमानत जप्त झाली आहे. काँग्रेसला राज्यात केवळ दोनच जागांवर विजय मिळाला आहे. यावेळी काँग्रेसला केवळ 2.33 टक्के मते मिळाली आहेत. उत्तर प्रदेशातील काँग्रेसची ही इतिहासातील सर्वात खराब कामगिरी आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात सक्रिय असताना ही खराब कामगिरी झाली आहे, याकडेही त्यांनी पक्षाचं लक्ष वेधलं.
सीडब्ल्यूसीच्या बाहेरही काँग्रेस आहे
सीडब्ल्यूसीच्या बाहेरही एक काँग्रेस आहे. कृपया त्यांचे विचार ऐका. जर तुम्हाला वाटत असेल तर… आमच्यासारखे अनेक नेते सीडब्ल्यूसीमध्ये नाहीयेत. मात्र काँग्रेसमध्ये पूर्णपणे एक वेगळा दृष्टीकोण आहे. त्याने काही फरक पडत नाही का? कारण आम्ही सीडब्ल्यूसीमध्ये नाही, देशभरात काँग्रेसी आहेत. केरळ, आसाम, जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशापासून गुजरातपर्यंत. पण त्यांचा दृष्टीकोण ठेवला जात नाही, असं सिब्बल यांनी म्हटलं आहे. तसेच गांधी परिवार कल्पनेत वावरत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
संबंधित बातम्या: