माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका; नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी प्रकृती बिघडली
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी गेले असता जाधव यांना हृदयविकाराचा झटका आला.
नवी दिल्ली | 24 जुलै 2023 : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी गेले असता जाधव यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.
हर्षवर्धन जाधव हे काही कामानिमत्ताने दिल्लीत आले होते. दिल्लीत आल्यावर त्यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली. गडकरी यांच्या निवासस्थानी असतानाच त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना तात्काळ आरएमएल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरू केले आहेत. वेळीच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने जीवावरचं संकट टळलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून धोका टळल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तसेच हा सौम्य धक्का होता, असंही त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं.
काही दिवस रुग्णालयात?
दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय दिल्लीकडे जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. जाधव यांना किती दिवस दिल्लीतील रुग्णालयात उपचार घ्यावे लागतील याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. संध्याकाळपर्यंत त्याबाबतची माहिती दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, जाधव यांना पाहण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव नवी दिल्लीत येऊ शकतात, अशी शक्यता आहे.
जाधव बीआरएसमध्ये
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन जाधव यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती म्हणजे बीआरएस या पक्षात प्रवेश केला आहे. त्यांनी हैदराबादमध्ये जाऊन बीआरएसमध्ये प्रवेश केला होता. हर्षवर्धन जाधव हे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडचे माजी आमदार आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवात मनसेतून झाली होती. जाधव यांच्या पक्षप्रवेशामुळे बईआरएसला बळ मिळालं आहे. यावेळी बीआरएसकडून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षप्रवेशाची आणि मुख्यमंत्रीपदाचीही ऑफर देण्यात आली होती.