शान शौकत ! कुत्र्यांसाठी विदेशी दारू, अंघोळीला बाथटब, 30000 पगारात कुणाला परवडतं?; ‘त्या’ फार्म हाऊसमधील धक्कादायक रहस्य
मध्यप्रदेशातील असिस्टंट इंजीनिअर हेमा मीणा हिच्याकडे प्रचंड घबाड सापडलं आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांचे डोळेच विस्फारले आहे. गैरमार्गाने मोठ्या प्रमाणावर संपत्ती कमावल्याने तिच्यावर कारवाईही करण्यात आली आहे.
भोपाळ : मध्यप्रदेशात लोकायुक्त अधिकाऱ्यंनी एका असिस्टंट इंजीनिअर हेमा मीणा हिच्या फार्म हाऊसवर छापा मारला. दोन दिवस ही छापेमारी सुरू होती. या छापेमारीत इतकं घबाड सापडलं की अवग्या 24 तासात तिला कामावरून काढून टाकलं. या छापेमारीत या इंजीनिअर तरुणीच्या घरात सुमारे 100 देशी विदेशी जातीचे कुत्रे आढळून आले. सोबत विदेशी मद्याचा साठाही आढळून आला आहे. हेमा मीणा यांच्या या फार्महाऊसमध्ये विदेशी कुत्र्यांचा प्रचंड थाटमाट होता. या श्वानांना पिण्यासाठी उंची दारू आणि अंघोळीसाठी बाथ टब होता. ही सर्व शानशौकत पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
हेमा मीणा हिने भोपाळमध्ये आलिशान फार्महाऊस बांधला होता. या फार्महाऊसमध्ये तब्बल 35 खोल्या आढळून आल्या आहेत. या महालासारख्या फार्म हाऊसमध्ये श्वानांची खास बडदास्त ठेवण्यात आली होती. श्वानांसाठी वेगळी केबिन तयार करण्यात आली होती. त्यांच्यासाठी बाथ टब तयार करण्यात आले होते. तसेच या श्वानांसाठी मशीनद्वारे पोळ्या बनवल्या जात होत्या.
श्वानांची किंमत किती?
यातील बहुतेक श्वान हे विदेशी आहेत. या श्वानांची किंमत किती असेल याचा काहीच अंदाज सांगता येत नाहीये. पण लोकायुक्त अधिकारी त्याचाही अंदाज लावत आहेत. पैसा कुठून आला हे जाणून घेण्यासाठी अधिकारी सर्व नोंदी करत आहेत. जप्त करण्यात आलेले हे देशी विदेशी जातीचे श्वान असल्याचा दावा हेमाने केला आहे. मात्र, हे श्वान खरोखरच जप्त केलेत की विकत घेण्यात आलेत याची अधिकारी शहानिशा करत आहेत.
दारूचा साठा पाहून अधिकारी चक्रावले
हेमाच्या घरात दारूचा प्रचंड साठा सापडला आहे. विदेशी मद्याच्या या सर्व बाटल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विदेशी मद्य पाहून अधिकारीही चक्रावून गेले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या श्वानांना देण्यासाठी हे विदेशी मद्य आणण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मेडिसिनल यूज म्हणून श्वानांना मद्य दिल्या जात असल्याचा दावा हेमाने केला आहे.
द्वेषातून तक्रार
दरम्यान हेमा मीणा हिच्या भ्रष्टाचाराची 2020मध्ये तक्रार करण्यात आली होती. हेमाच्याच एका नातेवाईकाने द्वेषातून ही तक्रार केली होती. लोकायुक्तांना ही तक्रार केली होती. हेमाने रायसेन आणि विदिशामध्ये कृषी जमीन खरेदी केली आहे. अधिकाऱ्यांप्रमाणे तिची राहणीमान आहे, असं या तक्रारीत म्हटलं होतं. या तक्रारीनंतर तीन वर्ष धीम्यागतीने तपास सुरू होता. अधिक माहिती मिळाल्यानंतर थेट छापेमारीच करण्यात आली.