30 हजाराच्या पगारात 98 एकर जमीन आणि फार्महाऊस, कसं शक्य आहे?; हेमा मीणा हिचा कौटुंबीक मित्रही पकडला
मध्यप्रदेशातील असिस्टंट इंजीनिअर हेमा मीणा हिच्याकडे सात कोटीची संपत्ती सापडली आहे. ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा अधिक ही रक्कम आहे. एवढी मोठी संपत्ती पाहून छापेमारी करणारे लोकायुक्त विभागातील अधिकारीही चक्रावून गेले आहेत.
भोपाळ : पोलीस हौसिंग कार्पोरेशनमधील असिस्टंट इंजीनिअर हेमा मीणा हिच्या फार्महाऊसवर छापेमारी करण्यात आली आणि सर्वांचेच डोळे विस्फारले गेले. अवघा 30 हजार रुपये पगार असताना हेमा मीणाकडे 7 कोटींची संपत्ती आली कशी? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला. या छापेमारीतून अनेक गोष्टी पुढे आल्या आहेत. हेमा मीणाकडे आलिशान फॉर्म हाऊससह 98 एकर जमीन असल्याचंही उघड झालं आहे. त्यामुळे लोकायुक्त अधिकारीही चक्रावले आहेत. अवघ्या 30 हजाराच्या पगारात हे कसं शक्य आहे? असा सवाल आता केला जात आहे.
हेमा मीणाकडे विदिशातील देवराजपूर येथे वेअरहाऊसमध्ये 56 एकर जमीन आहे. मुडियाखेडामध्ये 14 एकर फार्म हाऊस आहे. रायसेन येथील मेहगाव येथे 28 एकर जमीन आणि पॉली हाऊस आहे. अशी तिच्याकडे 98 एकर जमीन असल्याचं उघड झालं आहे. प्रचंड प्रमाणात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याप्रकरणी हेमा मीणाला नोकरीतून काढून टाकण्यात आलं आहे.
बंगल्याची किंमत एक कोटी
हेमाकडे मध्यप्रदेशात एक आलिशान बंगला आहे. या बंगल्याची किंमत एक कोटीपेक्षा अधिक आहे. हेमा ही मूळची रायसेन जिल्ह्यातील चपना गावची रहिवासी आहे. 2016मध्ये ती पोलीस हौसिंग कॉर्पोरेशनमध्ये दाखल झाली होती. या पूर्वी तिने कोच्चिमध्येही काम केलं आहे.
जनार्दनची कृपा
हेमा मीणावर मध्यप्रदेशातील पोलीस हौसिंग कार्पोरेशनचे इंजीनिअर जनार्दन सिंह यांची कृपा असल्याचं उघड झालं आहे. हेमा ही जनार्दन सिंहच्या हाताखालीच काम करत होती. हेमा आणि जनार्दन यांचं कनेक्शन उघड झाल्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या आदेशानंतर जनार्दनवरही कारवाई करण्यात आली आहे. जनार्दन सिंहलाही निलंबित करण्यात आलं आहे. हेमाच्या फार्महाऊसचं कामही जनार्दन सिंह यानेच केल्याचंही सांगितलं जातं.
हेमा म्हणाली…
या छापेमारी नंतर हेमा मीणाने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लोकायुक्त अधिकाऱ्यांनी जेवढी मालमत्ता जप्त केली आहे. ती सर्व माझ्या वडिलांची आहे, असं तिने सांगितलं. तर जनार्दन सिंह हे माझे कौटुंबिक मित्र आहेत, असंही तिने स्पष्ट केलं. मला नोकरी लागल्यानंतर माझे वडील ऑफिसला आले होते. तिथे त्यांची ओळख जनार्दनशी झाली होती. तेव्हापासून आमचे जनार्दन यांच्याशी कौटुंबीक संबंध आहेत, असंही तिने स्पष्ट केलं.