Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशमध्ये 3 बंडखोर उमेदवारांच्या हाती येऊ शकते सत्तेची चावी!
हिमाचलमध्ये तीन बंडखोर मोडू शकणार का 37 वर्षांची परंपरा?
शिमला: हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज (गुरुवार) सकाळपासून मजमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीचे कल पाहता भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्यात अटीतटीचा सामना पहायला मिळाला. भाजपचे बंडखोर उमेदवार दोन जागांवर आघाडीवर आहेत. अशात जर भाजपला बहुमताच्या आकड्यापेक्षा एक किंवा दोन जागा कमी मिळत असतील तर दोन बंडखोर उमेदवारांच्या हाती सत्तेची चावी येऊ शकते.
निकालाचा कल पाहता मेंनालागढ इथून भाजपचे बंडखोर के. एल. ठाकूर आघाडीवर आहेत. तर देहरा इथून भाजपचे बंडखोर होशियार सिंह आघाडीवर आहेत. हमीरपूरमधून काँग्रेसचे बंडखोर आशिष कुमार आघाडीवर आहेत. आशिष कुमार यांना यावेळी काँग्रेसकडून तिकिट मिळालं नव्हतं. त्यामुळे नाराज होऊन त्यांनी बंडखोरी केली होती.
शिमलामध्ये भाजप नेत्यांची बैठक
यादरम्यान शिमलामध्ये भाजपच्या दिग्गज नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री जयराम ठाकूर, प्रदेश प्रभारी विनोद तावडे आणि मंगल पांडेसुद्धा सहभागी आहेत. पक्ष कशाप्रकारे सरकार स्थापन करू शकेल, यावर बैठकीत चर्चा सुरू आहे. अपक्षांच्या भूमिकेवरही विचार-विनिमय केला जातोय. TV9 भारतवर्षच्या एग्झिट पोलनुसार, हिमाचल प्रदेशमध्ये भाजपची सत्ता पुन्हा एकदा येऊ शकते. तर एबीपी-सी वोटरनुसार, भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये अटीतटीचा सामना होऊ शकतो.
सत्ताबदलाचा नियम कायम राहणार की 37 वर्षांची परंपरा मोडणार?
हिमाचल प्रदेशमध्ये पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याची भाजपला अपेक्षा आहे. तर काँग्रेससाठीही या निवडणुकीतील विजय अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसला अपयशाचा सामना करावा लागतोय. याशिवाय आम आदमी पार्टीसुद्धा हिमाचलमध्ये आपलं नशीब आजमावतंय.
जर भाजप सरकार स्थापन करण्यात यशस्वी होत असेल तर 1985 नंतर हे पहिल्यांदा असं घडणार आहे. कारण हिमाचलमध्ये 1985 नंतर कोणत्याच राजकीय पक्षाला निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळालेला नाही. दुसरीकडे काँग्रेसकडून सत्ता पुन्हा एकदा स्थापन करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.